नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील लोकांना केजरीवाल सरकारने नवीन वर्षाच्या मुहूर्तावर खास भेट दिली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बस आणि मेट्रोसाठी एक कार्ड जारी केलं आहे, ज्यामुळे बस आणि मेट्रोत एकाच कार्डने प्रवास करता येईल.

या कार्डचा वापर विविध मार्गांवर चालणाऱ्या 200 डीटीसी बस आणि 50 क्लस्टर बसेसशिवाय मेट्रोमध्येही करता येईल. शहराच्या वाहतूक क्षेत्रातील हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

दिल्ली हे देशातील पहिलं शहर आहे, जिथे अशा कॉमन मॉबिलिटी कार्डचा वापर होईल. या सेवेचं उद्घाटन करताना केजरीवाल यांनी डीटीसीच्या बसचा प्रवासही केला.

''वाहतूक क्षेत्रातील हे मोठं पाऊल आहे, ज्याने दिल्लीकरांना आता सहजपणे प्रवास करता येईल'', असं केजरीवाल म्हणाले.

1 एप्रिलपासून डेबिट कार्डप्रमाणे असणाऱ्या या कार्डचा वापर केला जाईल. दिल्लीत सध्या जवळपास 3900 डीटीसी आणि 1600 क्लस्टर बस आहेत. यामुळे प्रवाशांचा आता मेट्रोच्या तिकिटाच्या रांगेत थांबण्याचा वेळ वाचेल, शिवाय बसमध्येही तिकिट काढण्याची गरज लागणार नाही.

दिल्लीत झालं, मुंबईत कधी?

मुंबईत बस, लोकल ट्रेन आणि मेट्रोच्या प्रवासासाठी वेगवेगळी तिकिटं काढावी लागतात. मुंबईकर एकाच दिवशी बस, ट्रेन आणि मेट्रोनेही प्रवास करतात. त्यामुळे मुंबईकरांना तिन्ही मार्गांचे तीन तिकिटं, पास किंवा कार्ड जवळ ठेवावं लागतं. शिवाय दररोज तिकिट काढायचं असल्यास प्रत्येक ठिकाणी तिकिटाच्या रांगेत उभं रहावं लागतं.

हे तिन्ही प्रवास एकाच तिकिटावर करता येतील, असं फडणवीस सरकारने जाहीर केलेलं तर आहे. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनीही हे आश्वासन दिलेलं आहे. मात्र अजून या योजनेबाबत काहीही हालचाली दिसत नाहीत. मुंबईत अशी सुविधा दिल्यास प्रवाशांसाठी ते अधिक सोयीचं होईल आणि ठीकठिकाणी जाणारा वेळही वाचू शकतो.