नवी दिल्ली : देशात सर्वात मोठं जाळं असणारं कुठलं सरकारी खातं असेल, तर ते रेल्वे मंत्रालयाचं. आपला हा भव्य पसारा सांभाळण्यासाठी रेल्वेच्या मदतीला येणार आहे आता एक गुप्त तिसरा डोळा. या तिसऱ्या डोळ्यातून दिल्लीतल्या रेल भवनाची नजर देशभरातल्या रेल्वे प्रकल्पांवर असणार आहे.


भारतीय रेल्वेने आपल्या देशभरातल्या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी ड्रोन कॅमेराचा वापर करण्याचा निर्णय घेतलाय. याआधी प्रायोगिक तत्वावर त्याची सुरुवात झालेलीच होती. पण यापुढे रेल्वे प्रकल्पांवर नजर ठेवण्यासाठी, ट्रॅकची देखभाल कशी चालू आहे हे पाहण्यासाठी आणि रेल्वेच्या इतर महत्वाच्या बांधकामांवर नजर ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करण्याचं रेल्वे मंत्रालयाने जाहीर केलंय. आज यासंदर्भातलं अधिकृत पत्रक काढून या निर्णयाची माहिती देण्यात आलीय.



रेल्वेच्या विविध झोन्सना ड्रोनचा वापर करण्याचे निर्देशही देण्यात आलेत. त्यामुळे दिल्लीतल्या रेल्वेमंत्रालयात बसूनही अधिकाऱ्यांना ग्राऊंडवर नेमकी काय परिस्थिती आहे हे पाहता येणार आहे. अधिकारी प्रकल्पाच्या प्रगतीबाबत जे रिपोर्ट पाठवतायत, त्यात खरंच किती तथ्य आहे याचा आढावाही आता फक्त एका क्लिकद्वारे घेता येणार आहे.

यात्रा, फेस्टिवलनिमित्तानं एखाद्या ठराविक रेल्वे स्टेशनवर गर्दी वाढणार असेल तर त्यावेळी कोणता अनुचित प्रकार घडू नये यासाठीही ड्रोन कॅमेरा वापरण्यात येणार आहे. रेल्वेच्या या उपक्रमांतर्गत मध्यप्रदेशातलं जबलपूर पश्चिम मध्य रेल्वेचं मुख्यालय या निर्णयाची अंमलबजावणी करणारं पहिलं झोनल मुख्यालय ठरलंय.



ज्या महत्वकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय, त्याच्या कामावरही त्यामुळे ड्रोनची नजर असेल. महाराष्ट्रासह देशभरात मागच्या काही दिवसांपूर्वी ज्या रेल्वे ट्रॅक उखडण्याच्या घटना झालेल्या होत्या, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठीही ड्रोन कॅमेरे प्रभावी ठरतील असा दावा रेल्वे मंत्रालयाचे राष्ट्रीय प्रवक्ते अनिल सक्सेना यांनी एबीपी माझाशी बोलताना केलाय.