2024 मध्ये देशात लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. यासाठी भाजपासह विरोधी पक्षाने जोरात मोर्चे बांधणी सुरु केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी ( 23 जून ) बिहारमधील पाटण्यात विरोधी पक्षांची बैठक होत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणाऱ्या या बैठकीत मोदी सरकारविरोधात रणनिती बनवली जाणार आहे. अशातच आपने काँग्रेसला इशारा देत बैठकीवर बहिष्कार टाकणार असल्याचं म्हटलं आहे.
दिल्लीतील प्रशासकीय सेवांवर नियंत्रण ठेवण्याच्या वटहुकूमाविरोधात काँग्रेसने पाठिंबा द्यावा. अन्यथा बैठकीवर बहिष्कार टाकणार, अशी माहिती आपमधील सूत्रांनी दिली आहे. तसेच, 23 जूनला होणाऱ्या बैठकीत वटहुकूमाविरुद्ध आपली भूमिका स्पष्ट करावी, यासाठी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी विरोधी पक्षातील नेत्यांना पत्र लिहिले आहेत.
केजरीवाल बैठकीत अध्यादेशाचा मुद्दा उपस्थित करण्याची शक्यता
'एबीपी न्यूज'ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल हे या बैठकीत अध्यादेशाचा मुद्दा उपस्थित करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. जर काँग्रेसने अध्यादेशाविरोधात केजरीवाल यांना समर्थन दिले नाही तर केजरीवाल या बैठकीत काढता पाय घेण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.
नेमकं प्रकरण काय?
दिल्लीतील प्रशासकीय बदल्या हा दिल्ली सरकारचा अधिकार असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. मात्र, त्यानंतर केंद्र सरकारने दिल्लीतील ‘गट-अ’च्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्यांसाठी एक प्राधिकरण स्थापण्याचा वटहुकूम काढला. न्यायालयाच्या निर्णयाला डावलून आणलेला हा वटहुकूम म्हणजे फसवणूक असल्याचा आरोप ‘आप’ सरकारने केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ११ मेच्या निकालापूर्वी, दिल्ली सरकारमधील सर्व अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्या ही बाब नायब राज्यपालांच्या अधिन होती.
संसदेत या वटहुकुमाचे विधेयक नामंजूर व्हावे यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल भाजपाविरोधी पक्षनेत्यांच्या भेटी घेतल्या. त्यात तामिळनाडूनचे मुख्यमंत्री एम. के स्टॅलिन, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची अरविंद केजरीवाल यांनी भेट घेतली होती.
बैठकीत 'हे' नेते होणार सहभागी
काँग्रेसचे नेते राहुल गांधी
काँग्रेस अध्यक्ष - मल्लिकार्जून खर्गे
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार
आपचे प्रमुख - अरविंद केजरीवाल
डीएमकेचे प्रमुख - एमके स्टॅलिन
झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख - हेमंत सोरेन
समाजवादी पक्षाचे प्रमुख - अखिलेश यादव
शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख - उद्धव ठाकरे
पीडीपी प्रमुख - महबूब मुफ्ती
नॅशनल कॉन्फरन्स प्रमुख - उमर अब्दुल्ला
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस - डी राजा
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस - सीताराम येचुरी
भारत कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी-लेनिनवादी) लिबरेशनचे सरचिटणीस - दीपांकर भट्टाचार्य