Army Jawan Alleges Wife Thrashed : पत्नीसोबत सुमारे 120 पुरुषांनी गैरवर्तन आणि मारहाण केल्याचा आरोप एका जवानाने केला आहे. एका जवानाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काश्मीरमध्ये तैनात असलेल्या एका लष्करी जवानाने आरोप केला आहे की, "तामिळनाडूमधील लोकांच्या एका गटाने त्याच्या पत्नीसोबत गैरवर्तन केलं आणि क्रूरपणे मारहाण केली." मात्र, पोलिसांनी या जवानाचे दावे अतिशयोक्ती असल्याचं सांगत फेटाळून लावले आहेत.


तामिळनाडूतील तिरुवन्नमलाई जिल्ह्यात काही लोकांच्या गटाने आपल्या पत्नीसोबत गैरवर्तन करत अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप लष्कराच्या एका जवानाने केला आहे. निवृत्त लष्करी अधिकारी लेफ्टनंट कर्नल एन थियागराजन यांनी पोस्ट केलेला एक व्हिडीओ ट्विटरवर समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये दिसणारी व्यक्ती लष्करी जवान हवालदार प्रभाकरन असल्याची माहिती आहे. प्रभाकरन हा तामिळनाडूच्या पडवेडू गावचा असून सध्या तो काश्मीरमध्ये तैनात आहे.


पाहा जवानाचा व्हायरल व्हिडीओ :






या व्हिडीओमध्ये लष्कराचा जवान म्हणाला, "माझी पत्नी एका ठिकाणी भाडेतत्त्वावर दुकान चालवते. तिला 120 लोकांनी मारहाण केली आणि दुकानातील सामान बाहेर फेकले. मी पोलीस अधीक्षकांना याचिका पाठवली असून त्यांनी कारवाईचे आश्वासन दिलं आहेत. पोलीस महासंचालक साहेब, कृपया मदत करा. त्यांनी माझ्या कुटुंबावर चाकूने हल्ला करून धमकावले आहे. माझ्या पत्नीसोबत गैरवर्तन करून अमानुषपणे मारहाण करण्यात आली."


जवानाचे दावे अतिशयोक्ती : पोलीस


दरम्यान, कंधवसल पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर यासंदर्भात एक निवेदन जारी केले आणि ही घटना अतिशयोक्ती असल्याचं म्हटलं आहे. पोलिसांनी सांगितलं की, रेणुगंबल मंदिराच्या मालकीच्या जमिनीवर बांधलेले एक दुकान प्रभाकरनचे सासरे सेल्वामूर्ती यांना कुमारने पाच वर्षांच्या कालावधीसाठी 9.5 लाख रुपयांना भाड्याने दिले होते. कुमार मरण पावल्यानंतर त्यांचा मुलगा रामू याला दुकान परत हवे होते, म्हणून त्याने पैसे परत करण्यास सहमती दर्शवली आणि 10 फेब्रुवारी रोजी करार झाला. 


रामूने दावा केला की, सेल्वामूर्ती यांनी पैसे घेण्यास आणि दुकान सोडण्यास नकार दिला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यानंतर 10 जून रोजी, रामू सेल्वमूर्ती यांची मुले जीवा आणि उदय यांना पैसे देण्यासाठी दुकानात गेला होता, त्यांनी रामूवर हल्ला केला. जीवाने रामूच्या डोक्यात चाकूने वार हल्ला केल्याची माहिती आहे.


पोलिसांनी म्हटलं आहे की, भांडणावेळी उपस्थित रामूच्या मदतीसाठी पुढे आले. यामुळे मोठी हाणामारी झाली आणि दुकानातील वस्तू बाहेर फेकल्या गेल्या. प्रभाकरनची पत्नी कीर्ती आणि तिची आई दुकानात असताना जमावाने त्यांच्यावर हल्ला केला नाही. नंतर संध्याकाळी प्रभाकरनच्या पत्नीनेही स्वतःला रुग्णालयात दाखल केले. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्याच्या पत्नीला गंभीर दुखापत झाल्याचे जवानाचा दावा असला तरी ते खरे नाही.