नवी दिल्ली : कोरोनासोबतच्या लढाईत भारतानं आज एक महत्वाचा टप्पा गाठला आहे. देशात दोन लशींना आपत्कालीन स्थितीतल्या वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ही दिलासादायक बातमी देशवासियांना मिळाली आहे.


जी घोषणा ऐकण्यासाठी संपूर्ण भारत देशाचे कान आतुरले होते. ती घोषणा अखेर आज झाली. कोरोनावर लसीला अखेर देशात मंजुरी मिळाली. त्यातही एकाचवेळी दोन लसींना मंजुरी मिळाली आहे. इंग्लंड, अमेरिकेसारखे काही मोजके देश आहेत. जिथे एकापेक्षा अधिक लशींना मंजुरी मिळाली आहे. या यादीत आता भारताचाही समावेश होतो. ही अभिमानास्पद बाब आहे. सीरम इन्सिट्यूट, भारत बायोटेक या दोन लशींना आपत्कालीन स्थितीत मर्यादित वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. सीरम इन्सिट्यूट ही मेक इन इंडियाचं उत्तम उदाहरण तर भारत बायोटेक ही संपूर्णपणे स्वदेशी लस आहे.


कोरोनाच्या लढाईत भारतानं गाठलेल्या या उद्दिष्टाबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनंही कौतुक केलं आहे. दक्षिण पूर्व आशियात आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळालेली ही पहिली लस. त्यामुळे कोरोनाच्या लढाईत लढायला बळ मिळेल असा आशावाद जागतिक आरोग्य संघटनेनं व्यक्त केला आहे.


मंजुरीसाठी कुठल्या टप्प्यांतून जावे लागले?


सीरम इन्स्टिटयूट- 23 हजार परदेशी नागरिकांवरचा क्लिनिकल डेटा प्राथमिक टप्प्यात सादर करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या क्लिनिकल फेजमध्ये देशात 1600 लोकांवर चाचणी करण्यात आली. ही लस 70.42 टक्के प्रभावी असल्याचा दावा केला आहे.


भारत बायोटेक- या लसीचा परिणाम काय होतो हे सुरुवातीला उंदीर, ससा यासारख्या प्राण्यांवर चाचणी करुन तपासण्यात आलं. पहिल्या आणि दुसऱ्या क्लिनिकल फेजमध्ये 800 जणांवर ही टेस्ट करण्यात आली. तिसऱ्या टप्प्यासाठी 22 हजार 500 लोकांची आत्तापर्यंत चाचणी करण्यात आली आहे.


या लशीवरुन कालच अखिलेश यादव यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. भाजपच्या काळातली लस आपण टोचून घेणार नाही असं ते म्हणाले होते. तर त्यांच्याच पक्षाच्या एका प्रवक्त्यानं ही लस माणसाला नपुंसक बनवू शकते अशी बेजबाबदार विधानं केली होती. या सगळ्यावरही देशाच्या औषध महानियंत्रकांनी उत्तर दिलं आहे.


सीरम इन्स्टिट्यट ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि AstraZeneca या ब्रिटीश कंपनीच्या संयुक्त साहाय्यानं भारतात लशीची निर्मिती करते आहे. भारत बायोटेकची तर संपूर्ण स्वदेशी लस आहे. आयसीएमआर,नॅशनल इन्सिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी या सरकारी संस्थांची त्यात मदत आहे. शिवाय झायडस कॅडिला या आणखी एका कंपनीला तिसऱ्या क्लिनिकल फेजसाठी परवानगी देण्यात आली आहे. भारतात मंजुरीच्या शर्यतीत असलेली फायझर कंपनी मात्र अजूनही वेटिंगवरच आहे. विशेष म्हणजे या फायजरला डब्लुएचओनं परवानी दिली आहे. पण कदाचित लस साठवण्यासाठीचं आवश्यक तापमान हा या मंजुरीसाठी महत्वाचा मुद्दा ठरला असावा.


लसीच्या मंजुरीत तापमानाचा मुद्दा सर्वात महत्वाचा ठरला?


सीरम इन्स्टिट्युट, भारत बायोटेक झायडस कॅडिला या तीनही लसींचं वैशिष्ट्य म्हणजे त्या 2 ते 8 डिग्री सेल्सियस इतक्या तापमानात प्रदीर्घ काळ टिकू शकतात. म्हणजे अगदी साध्या रेफ्रिजरेटरमध्येही त्यांची साठवणूक होऊ शकते.
याउलट अमेरिकन फायजर कंपनीची लस प्रदीर्घ काळ साठवायची असल्यास उणे 70 डिग्री तापमान आवश्यक आहे. 2 ते 8 डिग्री सेल्सियस तापमानात फायजरची लस केवळ 5 दिवस टिकू शकते. फायजर ची लस सीरमच्या लशीपेक्षा पाचपट महाग आहे हाही मुद्दा आहे.


आपत्कालीन स्थितीतल्या वापरासाठी काही अटींसह दोन लशींना भारतात मंजुरी मिळाली आहे. त्यानंतर आता लसीकरणाचा व्यापक कार्यक्रम देशात कधी सुरु होतो. याचीही उत्सुकता असेल पण 30 जानेवारी रोजी देशात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला, त्या घटनेला वर्ष पूर्ण होण्याआधीच देशात कोरोनाची लस तयार आहे हा दिलासाही मोठा आहे.


संबंधित बातम्या :