याविरोधात चंद्राबाबू नायडू यांनी आपल्या घरातच आज सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत उपोषण करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर समर्थक नायडू यांच्या घरी जात होते, मात्र पोलिसांनी त्यांनाही अडवलं. तर काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. नायडू यांनी आज सकाळी पक्षाच्या नेत्यांसोबत बैठक घेतली आणि पोलिस कारवाईचा निषेध केला.
पोलिसांनी सभेला परवानगी नाकारली
टीडीपीने आज (11 सप्टेंबर) वायएसआरसीपीच्या विरोधात 'चलो अत्माकुर'चं आवाहन केलं आहे. मुख्यमंत्री जगन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेस पक्षाकडून आपल्या कार्यकर्त्यांवरील वाढत्या हल्ल्याच्याविरोधात टीडीपीने ही रॅली आयोजित केली आहे. पण त्यांना सभेसाठी परवानगी न मिळाल्याने त्यांनी उपोषणाचा निर्णय घेतला. पोलिसांच्या माहितीनुसार, टीडीपी नेत्यांकडे 'चलो आत्माकुर' सभेसाठी परवानगी नाही. यासाठी हे पाऊल उचललं.
जमावबंदी, अनेक नेते ताब्यात
याआधी टीडीपीचे सरचिटणीस आणि एमएलसी नारा लोकेश हे 'अत्माकुर' इथे होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जात असताना, पोलिसांनी त्यांना रोखलं. पोलिसांनी नरसरावोपेटा, सटेनपल्ले, पलनाडू आणि गुरजलामध्ये जमावबंदी (कलम 144) लागू केली आहे. तर आत्माकुर इथे जाणाऱ्या पक्षाच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे.
हे नेते नजरकैदेत!
चंद्राबाबू नायडू यांच्यासह माजी मंत्री पी पुल्ला राव, नक्का आनंद बाबू, अल्पपती राजा, सिद्ध राघव राव, देवीनेनी उमामहेश्वर राव, आमदार एम गिरी, जी राममोहन, माजी आमदार बोंडा उमा, विधानपरिषद आमदार वायवीबी राजेंद्र प्रसाद, आणि तेलुगु युवताचे अध्यक्ष देवीनेनी अविनाश यांनाही नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे.