चेन्नई : भारतात सध्या ऑटो क्षेत्रात मंदीचा काळ सुरु आहे. ऑगस्ट महिन्यात सलग दहाव्या महिन्यात गाड्यांची विक्रीत घट झाली आहे. मात्र भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ऑटो क्षेत्रातील सुरु असलेल्या मंदीसाठी ओला आणि उबर कॅब सर्व्हिसला जबाबदार ठरवलं आहे.


मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाचे 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवारी (10 सप्टेंबर) चेन्नईत पत्रकारांशी संवाद साधला. भारताच्या अर्थव्यवस्थेत आलेली मरगळ हे सरकारसमोरील सर्वात मोठं आव्हान असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं.

तरुणांचा बदलती मानसिकता हे ऑटो क्षेत्रातील मंदी मागचं एक कारण असल्याचं निर्मला सीतारमण सांगितलं. त्या म्हणाल्या की, "ऑटोमोबाईल सेक्टरच्या परिस्थितीसाठी अनेक घटक कारणीभूत आहेत. ज्यात बीएस-6 तरतुदी, रजिस्ट्रेशन फीसंबंधित गोष्टी आणि लोकांच्या मानसिकतेचा समावेश आहे. नव्या गाडीसाठी ईएमआय देण्यापेक्षा तरुणाई ओला आणि उबर टॅक्सी सेवेला महत्त्व देत आहेत.

मागील महिन्यात 21 वर्षातील सर्वात कमी कारची विक्री झाली होती. ऑटो उत्पादन कंपनी सिएम (SIAM)नुसार, भारतीय बाजारात या महिन्यात गाड्यांच्या विक्रीत 41 टक्क्यांपेक्षा जास्त घसरणीची नोंद झाली आहे.

ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये सुरु असलेल्या मंदीबाबत अर्थमंत्र्यांचं हे वक्तव्य ऐकून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिली आहे. ट्विटरवर #NirmalaSitharaman, Ola and Uber आणि #Millenial गहे हॅशटॅग ट्रेण्ड झाले होते.

काँग्रेस नेते संजय झा यांनी ट्वीट केलं आहे की, "2.7 ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेला ओला आणि उबर खाली आणत आहेत. क्या कूल हैं हम''


तर अर्थतज्ज्ञ रुपा सुब्रामण्य यांनी लिहिलं आहे की, "नीती आयोग म्हणतं, भारतात बेरोजगारी नाहीय कारण ओला आणि उबर नोकरी देत आहे. अर्थमंत्री म्हणतात की, ऑटो क्षेत्रात मंदी आहे कारण लोक ओला आणि उबरचा वापर करत आहेत. हे कसं होऊ शकतं की ओला आणि उबर नोकरी तर देत आहे पण कार खरेदी करत नाही?


जोकर नावाच्या ट्विटर हॅण्डलवरुन ट्वीट केला आहे की, "बरं झालं अरविंद केजरीवाल सरकारची फ्री मेट्रो सेवा शुरु झाली नाही, नाहीतर त्यांच्यावरच आरोप झाला असता की दिल्लीत मेट्रो फ्री झाली आहे, त्यामुळे लोक गाड्या खरेदी करत नाहीत."


तर कॉमेडियन, पटकथा लेखक आणि गीतकार वरुण ग्रोव्हरनेही फेसबुकवर निर्मला सीतारमण यांच्या वक्तव्याची फिरकी घेतली आहे.