Andhra Pradesh Investment :  मागील काही वर्षांपासून भारतातील अनेक राज्य सरकारकडून गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आंध्र प्रदेश सरकारने ग्लोबल इन्वेस्टर समिटच्या माध्यमातून 13 लाख कोटींची गुंतवणूक प्राप्त मिळवल्याचा दावा केला आहे. 340 प्रकल्पाच्या माध्यमातून ही गुंतवणूक येणार आहे. पोलाद, ऊर्जा, सिमेंट, विमानतळ, हेल्थकेअर आणि उत्पादन अशा जवळपास 20 क्षेत्रांमध्ये ही गुंतवणूक होणार असून आंध्र प्रदेश वेगाने वाढत असलेली अर्थव्यवस्था असल्याचे सरकारने म्हटले. 


आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी सांगितले की, राज्याला सुमारे 13 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे 340 गुंतवणूक प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. 20 क्षेत्रातील जवळपास 6 लाख लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.  आम्ही 11 लाख कोटींचे 92 सामंजस्य करार त्वरीत करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. समिटला संबोधित करताना त्यांनी म्हटले की, उद्योजक, गुंतवणूकदार आमच्यासाठी महत्त्वाचे असल्याचे या समिटच्या माध्यमातून सांगू इच्छितो असे त्यांनी म्हटले.  G-20 चा नेता म्हणून आपला देश महत्त्वाची भूमिका बजावत आहे. यामुळे जागतिक गुंतवणूक आणि तंत्रज्ञान आकर्षित करण्याच्या दृष्टीने भारतासाठी मोठ्या संधी निर्माण झाल्या आहेत. आंध्र प्रदेश राज्य विकासाच्या नव्या संधी साधण्यास आघाडीवर राहण्यास तयार असल्याचे त्यांनी म्हटले. 


दावोसमधून महाराष्ट्रातील गुंतवणुकीसाठी 88 हजार 420 कोटींचे करार


जानेवारी महिन्यात दावोस येथे गुंतवणुकीबाबत राज्य सरकारने करार केले होते. दावोसमध्ये दोन दिवसात महाराष्ट्रातील गुंतवणूकीसाठी 88 हजार 420 कोटींचे करार झाले आहेत. या सामंजस्य करारामुळे  महाराष्ट्रात विविध क्षेत्रात गुंतवणूक वाढणार आहे, त्याशिवाय प्रत्यक्षपणे सुमारे 10 हजार पेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळणार आहे. 


न्यू एरा क्लिनटेक सोल्युशनचा चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे 20 हजार कोटी रुपयांचा कोल गॅसीफिकेशन प्रकल्प ( रोजगार १५ हजार) , ब्रिटनच्या वरद फेरो अॅलाँईजचा गडचिरोली जिल्ह्यातील चार्मोशी येथे 1 हजार 520 कोटींचा स्टील प्रकल्प ( रोजगार 2 हजार), इस्त्रायलच्या राजूरी स्टील्स अॅण्ड अलॉईजचा चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे ६०० कोटी रुपयांचा स्टील प्रकल्प ( रोजगार १ हजार), पोर्तुगालच्या एलाईट प्लास्ट अॅटो सिस्टीम्सचा पुणे जिल्ह्यातील पिंपरी येथे 400 कोटी रुपयांचा प्लास्टीक ऑटोमोटीव्हज् प्रकल्प ( रोजगार 2 हजार)  तसेच गोगोरो इंजिनियरींग व बडवे इंजिनियरींगचा 20 हजार कोटी रुपये गुंतवणूकीचा अॅटो प्रकल्प (राज्यात विविध ठिकाणी रोजगार 30 हजार)  असे काही करार करण्यात आले.