Rahul Gandhi :  भारतात सध्या 'आयडिया ऑफ इंडिया' धोक्यात आली असल्याचे प्रतिपादन काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केले. राहुल गांधी हे सध्या ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी केंब्रिज विद्यापीठाच्या बिझनेस स्कूलच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या नेतृत्वातील सरकारने स्वायत्त संस्था कमकुवत केल्या असल्याची टीका त्यांनी केली. 


राहुल गांधी यांनी म्हटले की, विरोधकांवर गुन्हे दाखल होत आहेत. माझ्यावर अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. पण हे गुन्हे हेतुपरस्पर दाखल गेले आहेत. देशातील प्रसारमाध्यमं आणि लोकशाहीच्या ढाच्यावर आघात होतो, तेव्हा विरोधी पक्ष म्हणून लोकांचे प्रश्न उचलणे तुमच्यासाठी अधिक आव्हानात्मक होते, असेही राहुल गांधी यांनी म्हटले.  


लोकशाहीवर हल्ला


त्यांनी पुढे म्हटले की, , लोकशाहीसाठी संसद, स्वतंत्र प्रसारमाध्यमे, न्यायपालिका आवश्यक आहेत. मात्र, आज या सगळ्यांवर दबाव आहे. भारतीयांना सध्या लोकशाहीच्या स्तंभावर होणाऱ्या हल्ल्याचा सामना करावा लागत आहे. भारतीय संविधानानुसार, भारत देश हा संघराज्य आहे. केंद्र सरकारला राज्यांशी संवाद साधण्याची आवश्यकता आहे. मात्र, हा संवाद तुटला आहे. केंद्राकडून एक विचार थोपवला जात आहे. विचार कोणीही थोपवला तर त्याची प्रतिक्रिया उमटते. भारतात धार्मिक विविधता आहे. शीख, मुस्लिम, ख्रिश्चनदेखील आहेत. मात्र, मोदी त्यांना दुय्यम दर्जाचे नागरीक समजतात. 


संसदेत विरोधी पक्षाचे काही नेते सरकारवर टीका करत होते, त्यांना तुरुंगात डांबण्यात आले. असे तीन ते चार वेळेस झाले असल्याचे गांधी यांनी सांगितले. 


पेगाससने हेरगिरी 


राहुल गांधी यांनी पेगाससचा मुद्दाही उपस्थित केला. माझ्या फोनमध्येही पेगासस स्पायवेअर होता. काही अधिकाऱ्यांनी मला सावध राहण्याची सूचना केली होती. फोनवर बोलताना काळजी सतर्क राहण्यास त्यांनी सांगितले. फोनद्वारे पाळत ठेवण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले होते, असेही राहुल यांनी म्हटले.


मोदी सरकारच्या या योजनेचे कौतुक


राहुल गांधी यांना लोकांसाठी अतिशय चांगली ठरलेली योजना कोणती, असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी यांनी उज्जवला योजना आणि जनधन योजनेचा उल्लेख केला. गॅस सिलेंडर देणे आणि लोकांचे बँकेत खाते उघडणे हे अतिशय चांगले, सकारात्मक पाऊल असल्याचे त्यांनी म्हटले. मात्र, मोदी हे भारताच्या आयडिया ऑफ इंडियाला उद्धवस्त करत आहेत. भारतीय कधीही स्वीकारू शकत नाही, असा विचार ते थोपवत असल्याची टीकाही राहुल गांधी यांनी केली.