Andhra Pradesh Kurnool Bus Fire: आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यात भीषण बस आगीची (Kurnool Bus Fire) दुर्दैवी घटना घडली असून सुमारे 20 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. गुरुवारी पहाटेच्या सुमारास उलिंडाकुंडा परिसरात ही दुर्घटना घडली. हैदराबादवरून बंगळुरूकडे निघालेल्या एका खासगी व्होल्वो बसमध्ये एकूण 40 प्रवासी होते. प्रवासादरम्यान बसला एका मोटरसायकलने धडक दिली आणि काही क्षणांतच बसला भीषण आग लागली. काही प्रवाशांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, परंतु आग इतक्या झपाट्याने पसरली की बस काही मिनिटांतच जळून खाक झाली.

Continues below advertisement


Andhra Pradesh Kurnool Bus Fire: मोटरसायकलची धडक आणि इंधन टाकीचा स्फोट


याबाबत प्राथमिक माहिती अशी की, मोटरसायकल बसला येऊन धडकली आणि त्या धडकेत बसच्या इंधन टाकीचा स्फोट झाला. त्यानंतर बसला प्रचंड आग लागली. घटनेनंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले, परंतु त्यापूर्वीच अनेक प्रवासी बसमध्ये अडकले होते. स्थानिक प्रशासन, पोलीस आणि अग्निशमन दलाने संयुक्तपणे बचावकार्य सुरू केले असून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींची शोकभावना 


या दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त करत म्हटले आहे की, “कुर्नूल जिल्ह्यात घडलेल्या या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांविषयी मी अतिशय दु:ख व्यक्त करतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या भावना आहेत. जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो.” तसेच त्यांनी जाहीर केले की, “या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना प्रधानमंत्री राष्ट्रीय राहत निधीतून 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपये मदत देण्यात येईल.”






President Draupadi Murmu : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची प्रतिक्रिया


राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही या घटनेबाबत शोक व्यक्त करत म्हटले, “कुर्नूल जिल्ह्यातील बस आगीची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्या कुटुंबियांना मनःपूर्वक संवेदना व्यक्त करते आणि जखमी लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करते.”


CM Chandrababu Naidu reaction: मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची प्रतिक्रिया


आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या घटनेवर तीव्र दु:ख व्यक्त केले. “कुर्नूल जिल्ह्यातील चिन्ना टेकूर गावाजवळ झालेल्या या भीषण बस आगीच्या दुर्घटनेबद्दल ऐकून मला धक्का बसला. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्यांच्या कुटुंबीयांबद्दल माझ्या मनापासून संवेदना आहेत. जखमी आणि बाधित कुटुंबांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश मी प्रशासनाला दिले आहेत,” असे त्यांनी म्हटले आहे.


Jagan Mohan Reddy reaction: जगन मोहन रेड्डी यांची प्रतिक्रिया


माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी “या भीषण घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती मी मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो. जखमी प्रवाशांना तातडीने आवश्यक वैद्यकीय मदत मिळावी, अशी मी सरकारला विनंती करतो," अशी प्रतिक्रिया दिली आहे. 


राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या, पाहा Video



आणखी वाचा 


Sangli News: जतमधील राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे नाव रात्रीत बदललं; काही दिवसांपूर्वी धुराडा पेटू देणार नाही असा पडळकरांनी जयंत पाटलांना दिलेला इशारा