Andhra Pradesh Capital : 'विशाखापट्टणम' (Visakhapatnam ) ही आंध्र प्रदेशची (Andhra Pradesh) नवीन राजधानी असल्याची घोषणा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी ( YS Jagan Mohan Reddy ) यांनी केली आहे. येत्या 3 आणि 4 मार्च रोजी आंध्र प्रदेशमध्ये जागतिक गुंतवणूक परिषदेचं आयोजन करण्यात येणार आहे. त्यासंबंधित आयोजित केलेल्या दिल्लीमधील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी ही घोषणा केली. 


"आम्ही 3 आणि 4 मार्च रोजी विशाखापट्टणम येथे जागतिक शिखर परिषद आयोजित करत आहोत. मी तुम्हाला वैयक्तिकरित्या शिखर परिषदेसाठी आमंत्रित करण्यासाठी आलो आहे. विदेशी आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांनी आमच्या नव्या राजधानीला भेट द्यावी आणि आंध्र प्रदेश राज्यात व्यवसाय करणे किती सोपे आहे ते पहावे, असे आवाहन यावेळी मुख्यमंत्री रेड्डी यांनी केले आहे. दरम्यान, या पूर्वीच मुख्यमंत्री रेड्डी यांनी विशाखापट्टणम हे राज्य प्रशासनाचे प्रमुख ठिकाण म्हणून प्रस्तावित केले होते. मुख्यालय म्हणून हेच राज्याच्या राज्यपालांचे ठिकाणही असेल. परंतु विधिमंडळाचे कामकाज अमरावतीतून चालणार आहे.  







 
'विशाखापट्टणम'ला आंध्र प्रदेशची नवी राजधानी घोषणा करण्याआधी कृष्णा नदीच्या काठावरील प्राचीन वारसा असलेल्या अमरावतीची राजधानी म्हणून घोषणा करण्यात आली होती. परंतु ती रद्द करून विशाखापट्टणमला नवीन राजधानीची मान्यता देण्यात आली आहे. 






पूर्वाश्रमीच्या आंध्रप्रेदश राज्याचे विभाजन होऊन तेलंगणा या नव्या राज्याची निर्मिती झाल्यानंतर हैद्राबाद हे महत्त्वाचं शहर तेलंगणाला राजधानी म्हणून मिळाले. त्यानंतर आंध्रप्रदेश सरकारने आपली राजधानी अमरावती घोषित करून त्यांच्या नव्या बांधणीसाठी विशेष प्रयत्न केले. अमरावतीमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मोठी गुंतवणूक देखील करण्यात आली होती. एन. चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील टीडीपी सरकारने 2015 मध्ये अमरावतीला राज्याची राजधानी म्हणून विकसित करण्यासाठी शेतकऱ्यांकडून 33,000 एकर जमीन संपादित केली होती. परंतु याठिकाणी आता फक्त विधिमंडळाचे कामकाज चालणार आहे. तर विशाखापट्टणम ही आंध्र प्रदेशची राजधानी असणार आहे.