Andhra Pradesh News : आंध्र प्रदेश पोलिसांनी शनिवारी दोन लाख किलो गांजा जाळून नष्ट केला आहे. नष्ट करण्यात आलेल्या गांजाची किंमत तब्बल दोनशे कोटी रूपयांपेक्षा जास्त होती. आंध्र प्रदेश पोलिसांनी गेल्या काही वर्षांपासून राज्यातील काही जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त केला होता. तो शनिवारी जाळून नष्ट केला. 


आंध्र प्रदेश पोलिसांनी गांजा जाळलेला व्हिडीओ त्यांच्या अधिकृत ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, दोनशे कोटींपेक्षा जास्त किमतीचा गांजा जाळण्यात आला आहे. परंतु, हा गांजा जाळत असताना गांजा साठवून ठेवलेल्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी रेड कार्पेट आंथरण्यात आले होते.






आंध्र प्रदेश पोलिसांमधील एका अधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात अंमली पदार्थांची तस्करी रोखण्याची मोहीम राबवली जात आहे. माओवादी गांजाच्या लागवडीला प्रोत्साहन देत आहेत. ओडिशातील 23 जिल्हे आणि विशाखापट्टणम जिल्ह्यातील 11 मंडळांमध्ये गांजाची मोठी लागवड केली जात आहे. 


अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी राबवण्यात आलेल्या मोहिमेला ऑपरेशन परिवर्तन असे नाव देण्यात आले आहे. या अंतर्गत आतापर्यंत 406 पोलीस पथकांनी 11 मंडळांतील 313 गावांमधील गांजाची शेती नष्ट केली आहे. तर या कारवाईत 1 हजार 500 लोकांना अटक केली असून त्यांच्याकडून 314 गाड्या जप्त केल्या आहेत.  


महत्वाच्या बातम्या