नवी दिल्ली: रिटेल आणि टेलिकॉम क्षेत्रानंतर आता मुकेश अंबानी हे थेट टेस्लाच्या इलॉन मस्कशी भिडणार आहेत. मुकेश अंबानी यांनी आता उर्जा आणि ट्रान्पोर्टेशन या क्षेत्रात गुंतवणूक केली आहे. अमेरिकेची कंपनी असलेल्या स्काय ट्रॅन या पर्सनल रॅपिड ट्रान्झिट कंपनीमध्ये तब्बल 25.76 मिलियन डॉलरची गुंतवणूक केली आहे.
मुकेश अंबानी यांनी आता स्काय ट्रॅन या कंपनीची भागिदारी विकत घेतली आहे. स्काय ट्रॅन ही अमेरिकन कंपनी पॉड टॅक्सी तयार करते. ही सुविधा ऑटोमेशनवर कार्यरत आहे. त्यामुळे त्यांनी आता या क्षेत्रातील इलॉन मस्क यांना थेट आव्हान दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे येत्या काळात या दोन अब्जाधिशांमध्ये स्पर्धा पहायला मिळणार आहे.
मुकेश अंबानी आता उर्जा क्षेत्रातील आपली गुंतवणूक वाढवत आहेत. येत्या काही काळात ते ई-कारच्या व्यवसायातही गुंतवणूक करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्काय ट्रॅन ही कंपनी पर्सनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीमसारख्या विद्युत वाहनांचा विकास करत आहे. हा प्रकल्प पूर्णपणे सौर ऊर्जेवर आधारित असून त्यामुळे प्रदूषणाचा धोका नाही, तसेच प्रवासी वाहतूक कोणत्याही अडथळ्याविना पार पडते.
Bitcoin: टेस्लाची बिटकॉइनमध्ये 1.5 अब्ज डॉलरची गुंतवणूक, बिटकॉइनची किंमत नव्या उंचीवर
या आधी मुकेश अंबानी यांची अॅमेझॉनशी स्पर्धा पहायला मिळाली आहे. रिलायन्सने फ्यूचर ग्रुपशी रिटेल आणि होलसेल श्रेत्रात एक डील केली आहे. त्याला अॅमेझॉनने आक्षेप घेतला होता. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे.
रिलायन्सच्या 2020 च्या अहवालात असं सांगण्यात आलंय की येत्या काळात कंपनी ही ई- कारची बॅटरी आणि ट्रान्सपोर्टसाठी हायड्रोजनच्या विकासावर भर देणार आहे. ब्लूमबर्गच्या एका अहवालानुसार रिलायन्स आपल्या रिफायनरीजमधून निघणाऱ्या फीडस्टॉकपासून हाय व्हॅल्यू प्रोडक्ट बणवण्यासाठी मोठी गुंतवणूक करणार आहे. गेल्या वर्षी मुकेश अंबानी यांनी यावर बोलताना सांगितलं होतं की रिलायन्सकडे अशा पद्धतीचे तंत्रज्ञाना आहे.