मुंबई : वृत्तपत्रांमध्ये दर दिवशी अनेक जाहिराती येतात. काही जाहिराती या विशेष लक्षवेधी ठरतात. सध्याही एक अशीच जाहिरात साऱ्या देशाचं लक्ष वेधून गेली आहे. फक्त इतकंच नव्हे, तर ही जाहिरात सर्वांनाच काही प्रश्नांची उत्तरं शोधायला भाग पाडत आहे. 


टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्रात आलेल्या एका जाहिरातीने सर्व देशवासीयांना आज बुचकळ्यात टाकले.  भारतामध्ये एकदोन नव्हे तर, तब्बल 500 बिलियन डॉलरची गुंतवणूक करायची इच्छा आहे, असं सांगत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच आवाहन करणारी ही जाहिरात आहे एका कंपनीची. फारशी कोणाच्याही नजरेत नसणाऱ्या या कंपनीची जाहिरात अनेक चर्चांना वाव देत आहे. 


Landomus realty असं या कंपनीचं नाव आहे. प्रदीप कुमार एस हे या कंपनीचे चेअरमन आहेत. या कंपनीच्या संकेतस्थळावरही वृत्तपत्रातील जाहिरातीत करण्यात आलेल्या आवाहनाचा उल्लेख आणि त्या संदर्भातील माहिती आहे. 'अवर टीम' या रकान्याखाली संचालकांचे फोटो आहेत. 2015 मध्ये म्हणजे अवघ्या पाच वर्षांपूर्वी या कंपनीची नोंदणी करण्यात आल्याचं यावरुन कळत आहे. 




कंपनीच्या कामगिरीची अधिक माहिती मात्र या संकेतस्थळावर उपलब्ध होत नाही. त्यामुळे या कंपनीचं गूढ नेमकं काय आहे आणि भारतात इतक्या मोठ्या रकमेची गुंतवणूक करताना त्यांना पंतप्रधानांना आवाहन करणारी जाहिरात अशा प्रकारे वृत्तपत्रात नेमकी का छापावी लागते हा प्रश्नच आहे.  गुंतवणुकीसाठी त्यांनी जाहिरातीत सांगितलेला ५०० बिलियन डॉलर हा आकडाही तोंडात बोट घालायला लावणारा आहे. भारताच्या दरवर्षीच्या बजेट पेक्षा ही मोठी रक्कम आहे. त्यामुळे देशातल्या एका प्रसिद्ध इंग्रजी वृत्तपत्रात पहिल्या पानावर जाहिरात देणारी ही कंपनी नेमकी कोण आहे हे समोर यायला हवं अशीच अनेकांची भूमिका आहे.