Amul Milk Price Hike : ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा झटका बसला आहे. अमूल कंपनीनं दूधाच्या (Amul Milk) दरांत प्रति लिटर 2 रुपयांनी वाढ केली आहे. आता एक लिटर फुल क्रीम दुधाचा (Amul Full Cream Milk) दर 63 रुपये प्रति लिटर झाला आहे. सणासुदीपूर्वी आधीच महागाईनं जनता होरपळली आहे. अशातच आता दूधाच्या दरांत झालेल्या वाढीनं सर्वसामान्यांच्या खिशाला चाप बसणार आहे. 


अमूल कंपनीकडून अचनाक करण्यात आलेल्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे. यापूर्वीही अमूलनं दूधाच्या दरांत वाढ केली होती. गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशननं (Gujarat Cooperative Milk Marketing Federation) आपल्या फुल क्रीम दुधाच्या प्रति लिटर किमतींत 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. वाढीनंतर अमूलच्या फुल क्रीम दुधाची किंमत 63 रुपये प्रति लिटरवर पोहोचली आहे. दरवाढीपूर्वी दूधाचे दर 61 रुपये प्रति लिटर होते. मात्र, दुधाच्या दरवाढीबाबत कंपनीकडून अद्याप कोणतंही निवेदन जारी करण्यात आलेलं नाही. 


यापूर्वी अमूलकडून दोनदा दरवाढ


अमूल कंपनीनं तिसऱ्यांदा दूधाच्या दरांत वाढ केली आहे. कंपनीनं यापूर्वी ऑगस्ट आणि मार्चमध्ये आपल्या दुधाच्या उत्पादनाच्या किमती वाढवल्या होत्या. याआधी ऑगस्टमध्ये अमूलसह प्रमुख दूध उत्पादक आणि वितरकांनी त्यांच्या उत्पादनांच्या किमतींत 50 रुपयांनी वाढ केली होती. अमूलच्या पाठोपाठ मदर डेअरीसारख्या दुधाच्या ब्रँडनंही दुधाच्या दरांत लिटरमागे 2 रुपयांनी वाढ केली होती.


वाढत्या किंमतींचा परिणाम सर्वसामान्यांच्या बजेटवर 


आजच्या दूध वाढलेल्या किमतीचा परिणाम घरगुती बजेटवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण दूध हा सर्वाधिक वापरल्या जाणार्‍या वस्तूंपैकी एक आहे. नव्या दरांनुसार, आता अमूल शक्ती दूध 50 रुपये प्रतिलिटर, अमूल सोना 62 रुपये आणि अमूल ताजा 56 रुपये प्रतिलिटर दरानं उपलब्ध आहे.