नवी दिल्ली : अमित शाहांची प्रकृती हा गेल्या काही महिन्यांपासून राजकीय वर्तुळात कुजबुजीनं चर्चिला जाणारा विषय. पण याबाबतच्या सगळ्या शंका कुशंकांना मागे टाकत अमित शाह भाजपच्या मिशन बिहारसाठी स्वत: मैदानात उतरणार आहेत. बिहारमध्ये 243 जागांसाठी तीन टप्प्यांत मतदान पार पडणार आहे. त्यासाठी अमित शाह यांच्या किमान 12 रॅली होणार असल्याची माहिती भाजप सूत्रांनी दिली आहे. यातल्या काही रॅली व्हर्चअुल असतील, पण किमान 9 रॅली ते प्रत्यक्षपणे संबोधित करतील असं सांगितलं जातंय.
पंतप्रधान मोदी यांच्याही 12 रॅलीज बिहारच्या रणधुमाळीत होणार आहेत. त्यांच्या पहिल्या सभेची तारीख अद्याप अंतिम झालेली नाही. पण 22 किंवा 23 ऑक्टोबरला पंतप्रधानांची पहिली जाहीर सभा होऊ शकते. बिहारमधल्या आरामधून ते भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ करतील. जेडीयूचे अध्यक्ष नितीशकुमार यांच्यासोबतची ही संयुक्त सभा असेल. कोरोनाच्या संकटात गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांचा सार्वजनिक वावर कमी झालेला आहे. पण बिहारच्या निवडणुकीत जनतेशी संवाद साधण्यासाठी अनेक पक्षांचे नेते व्हर्चुअल रॅलीपेक्षा थेट संबोधनावरच भर देण्याची शक्यता आहे. त्यात अमित शाह यांच्या प्रकृतीबाबत अनेक चर्चा सुरु असल्यानं त्यांची प्रत्यक्ष उपस्थिती या रणधुमाळीत किती दिसतेय हे पाहणंही महत्वाचं असेल.
अमित शाह संसदेच्या अधिवेशनावेळी एम्स हॉस्पिटलमध्ये कोविड पश्चात उपचारांसाठी दाखल झाले होते. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी एकही दिवस अधिवेशनात हजेरी लावली नव्हती. पण केंद्रीय गृहमंत्रलायाच्या बैठका ते घेत होते. बिहारच्या जागा वाटपाच्या बैठका, आघाडीसंदर्भात रणनीती ठरवण्यासाठी जी खलबतं झाली त्यातही त्यांनी सहभाग घेतलेला होता. त्यामुळे आता बिहारच्या निवडणुकीच्या निमित्तानं अमित शाह पुन्हा बॅक इन अॅक्शन दिसणार आहेत.
संबंधित बातम्या :