Amit Shah Pitches For Tamil PM In Future: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी 2024 लोकसभा निवडणुकांपूर्वी मोठं वक्तव्य केलं आहे. दक्षिणेतील राज्यांमध्ये भाजपचा (BJP) दारुण पराभव झाला. कर्नाटकात अपेक्षा होत्या, मात्र काँग्रेसनं एकहाती सत्ता मिळवत, तिथूनही भाजपला बाहेरचा रस्ता दाखवला. अशातच दक्षिणेकडून हद्दपार झाल्यानंतर भाजपनं पुन्हा दक्षिणेत पाय रोवण्यासाठी हालचाली सुरू केल्याचं दिसतंय, ते अमित शाहांच्या वक्तव्यामुळे.


दक्षिणेतील राज्यांमध्ये सततच्या पराभवानंतर अमित शाह यांनी तामिळ पंतप्रधानांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण चेन्नईतील भाजप पदाधिकाऱ्यांच्या बंद दाराआड झालेल्या बैठकीत अमित शाह यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. अमित शाह म्हणाले की, आपण तामिळनाडूतील दोन संभाव्य पंतप्रधान कामराज आणि मूपनार यांची संधी गमावली आहे. त्यांना पंतप्रधान पदापर्यंत न पोहचू देण्यासाठी डीएमके जबाबदार असल्याचंही ते म्हणाले आहेत. 


"कोणताही सर्वसामन्य गरीब तमिळ व्यक्तीनं पंतप्रधान व्हावं"


गरीब कुटुंबातील तमिळ व्यक्तीनं भारताचा पंतप्रधान व्हायला हवं, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी सांगितलं. पक्षाच्या सूत्रांनी यासंदर्भात माहिती दिली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असलेले अमित शाह चेन्नईमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बंद दरवाजाच्या बैठकीत बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केल्याचं बोललं जात आहे. 


द्रमुक आणि त्याचे दिवंगत प्रमुख एम. करुणानिधी यांची खिल्ली उडवत त्यांनी तामिळनाडूतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. कामराज आणि जी.के. मूपनार यांच्याकडे पंतप्रधान होण्याची क्षमता होती, पण करुणानिधी यांनी त्यांची शक्यता हाणून पाडली, असंही अमित शाह म्हणाले. 


अमित शाहा असं का म्हणाले? 


तमिळ पंतप्रधानांचा मुद्दा हेरत अमित शाह यांनी डीएसकेला कोंडीत पकडण्याची प्रयत्न केल्याचं म्हटलं जात आहे. द्रमुकनं तामिळनाडूमधील सर्व 39 लोकसभेच्या आणि पुद्दुचेरीमधील एकमेव जागा जिंकण्याचा दावा केला आहे. शाह यांच्या 'तमिळ पंतप्रधान' टिप्पणीला भाजपच्या तामिळनाडूपर्यंत पोहोचण्याची पार्श्वभूमी निश्चित करण्याचा प्रयत्न म्हणून पाहिलं जात आहे. कारण तिरुवदुथुराई अधानम यांचे सेंगोल स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या नव्या इमारतीत स्थापित केलं होतं.


तामिळनाडू दौऱ्यात तामिळ स्वाभिमानाचा जयघोष केल्यानंतर अमित शहा यांनी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे जाहीर सभा घेऊन काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, "यूपीए सरकारनं 10 वर्षात 12 लाख कोटींचा घोटाळा केला. आजपर्यंत 9 वर्षांच्या मोदी सरकारवर एक रुपयाचाही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही. यूपीए सरकारच्या काळात 'आलिया, मालिया जमालिया'. 'पाकिस्तानातून येथे घुसून बॉम्बस्फोट घडवून आणायचे. मनमोहन सरकारमध्ये त्यांच्याविरुद्ध काहीही करण्याची हिंमत नव्हती. या नऊ वर्षांत पंतप्रधान मोदींच्या सरकारनं देशाची अंतर्गत सुरक्षा सुनिश्चित करण्याचं काम केलं आहे."