नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दिल्लीतील एम्समध्ये रात्री दोनच्या सुमारास त्यांना दाखल केलं. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याची माहिती आहे. एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या नेतृत्त्वात अमित शाह यांच्यावर उपचार केले जात आहेत.
कोरोनाची लागण झाल्यानंतर अमित शाह यांना 2 ऑगस्ट रोजी गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मागील आठवड्यात म्हणजेच 14 ऑगस्ट रोजी ते कोरोनामुक्त झाले होते. अमित शाह यांनी स्वत:च ट्वीट करुन याबाबतची माहिती दिली होती. यानंतर त्यांना मेदांता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. त्यांना होम आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला होता.
मात्र सोमवारी (17 ऑगस्ट) रात्री त्यांना ताप होता आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
एम्सकडून अमित शाहांच्या प्रकृतीविषयी माहिती
दरम्यान अमित शाह यांच्या प्रकृतीसंदर्भात एम्सकडून माहिती देण्यात आली आहे. गृहमंत्री अमित शाह यांना मागील तीन ते चार दिवसांपासून थकवा आणि अंगदुखीचा त्रास होत आहे. ते कोरोना निगेटिव्ह आहेत. त्यांची प्रकृती व्यवस्थित असून ते रुग्णालयातूनच आपलं काम करत आहेत.
संबंधित बातम्या
Amit Shah Beats Corona | अमित शाह यांची कोरोनावर मात
Amit shah Corona Positive | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण