नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनावर विजय प्राप्त केल्यानंतर त्यांना आता मेदांता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शाह यांनी ट्वीट करत ही माहिती दिली, त्यानंतर त्यांनी स्वत: त्यांच्या ट्विटरहून सर्वांनी केलेल्या प्रार्थनेसाठी आणि सपोर्टसाठी सर्वांना धन्यवाद दिले.


आपल्या ट्वीटमध्ये अमित शाह म्हणाले, आज माझ्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला. माझ्यासाठी प्रार्थना केल्याबद्दल सर्वांचे आभार. हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफने जे केले त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो.





अमित शाह यांना २ ऑगस्टला कोरोनाची लागण झाली होती.  अमित शाह यांनी स्वत: ट्विटरवर याबाबत माहिती दिली होती. त्यांना दिल्लीतील मेदांता रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. तसेच त्यांच्या संपर्कात जे लोक आले होते, त्यांनी कोरोनाची टेस्ट करुन घ्यावी, अशी विनंती देखील त्यांनी केली होती.

कोविड अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ते राममंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. काही दिवसांपूर्वी भाजपा खासदार मनोज तिवारी यांनी ट्वीट करत अमित शाह कोरोनामुक्त झाल्याची माहिती दिली होती. परंतू काही वेळातचं तिवारी यांनी ते ट्वीट डिलीट केल्यामुळे शाह यांच्या प्रकृतीबद्दल संभ्रम निर्माण झाला होता.  आज स्वत: शाह यांनी आपल्या माहिती दिल्यामुळे हा संभ्रम आता दूर झाला आहे.