नवी दिल्ली : कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे देशाच्या पर्यटनाशी संबंधित दोन ते साडेपाच कोटी नोकऱ्या गमावल्याची माहिती पर्यटन मंत्रालयाने दिली आहे. तसंच कोरोनामुळे किमान 72 हजार कोटी आणि जास्तीत जास्त 1.60 लाख कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं मंत्रालयाने सांगितलं. पर्यटन मंत्रालयाचे सचिव योगेंद्र त्रिपाठी यांनी सोमवारी (17 ऑगस्ट) संसदीय स्थायी समितीच्या बैठकीत प्रेझेंटेशन सादर केलं. यामध्ये ही माहिती देण्यात आली.
सूत्रांच्या माहितीनुसार, पर्यटन आणि नागरी उड्डाण विभागावर कोरोना महामारीच्या परिणामाची चर्चा करण्यासाठी संसद भवनात परिवहन, संस्कृतिक तसंच पर्यटनाबाबत संसदीय समितीची बैठक पार पडली. पर्यटन क्षेत्रात अद्यापही अनिश्चिततेचं वातावरण कायम आहे. कोरोनाचा पर्यटन आणि हवाई उड्डाण क्षेत्रावर अतिशय नकारात्मक परिणाम झाला आहे. यामुळे या क्षेत्रातील नोकऱ्यांना धोका आहे.
पर्यटन क्षेत्राप्रमाणेच कोरोना महामारीचा फटका हवाई वाहतूक क्षेत्रालाही बसला आहे. हवाई मंत्रालयाचे सचिव पी एस खरोला यांनी आपल्या प्रेझेंटेशनमध्ये सांगितलं की, आंतरराष्ट्रीय विमानांच्या वाहतुकीमध्ये 50 ते 60 टक्क्यांपेक्षा जास्त तर देशांतर्गत वाहतुकीमध्ये 50 टक्क्यांमध्ये जास्त कपात होण्याची शक्यता आहे. मात्र अंदाजे किती महसुलाचं नुकसान होऊ शकतं, याबाबत खरोला यांनी सांगितलं नाही.
दरम्यान पर्यटन आणि हवाई वाहतूक, या दोन क्षेत्रातील व्यवसाय पूर्वीप्रमाणे सुरळीत कधी होतील, याचा अंदाज बांधता येत नसल्याचं मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. 2021, 2022 की 2023, व्यवसाय नेमका कधी सुरळीत होईल हे सांगणं कठीण असल्याचं पर्यटन मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने म्हटलं.