शिमला : मागील काही काळापासून महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय़ घेण्यात आला. असं असतानाही हिमाचल प्रदेशात मात्र अद्यापही असे कठोर निर्णय़ घेण्यात येत नव्हते. येथील व्यवसाय चक्राला पर्यटनामुळे मिळालेली गती आणि स्थिरावणारी अर्थव्यव्था यामुळं केवळ आरटीपीसीआर चाचणीचीच अट येथे बाहेरुन येणाऱ्यांना पाळावी लागत होती. पण, आता मात्र कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी हिमाचल प्रदेश सरकारने राज्यात 7 मे पासून 16 मे पर्यंतच्या कालावधीत लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. 


मुख्यमंत्री जयराम ठाकुर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला. हिमाचलमध्ये लॉकडाऊन काळात सरकारी आणि खासगी कार्यालयं पूर्णपणे बंद असणार आहेत. यामध्ये फक्त आरोग्य, वीजपुरवठा, दूरसंचार, पाणी पुरवठा, स्वच्छता यांसारख्या अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आलं आहे. 


बांधकाम क्षेत्र, बागकाम, शेती विषयक कामं आणि शासकीय योजनांची कामं मात्र या काळात सुरु राहतील. येथील शाळा आणि शैक्षणिक संस्था 31 मे पर्यंत बंद असतील. सरकारी आणि खासगी वाहतूकीसाठी 50 टक्केप्रवासी क्षमतेची अट घालण्यात आली आहे. याशिवाय राज्यांतर्गत परिवहन सेवाही सुरु असणार आहे.


'सूर नवा ध्यास नवा'च्या सेटवर गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाई यांचा गोंधळ 


मंत्रीमंडळ बैठकीत हिमाचलमध्ये 10 बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याता निर्णय घेण्यात आला. ज्या निर्णयानंतर सर्व विद्यार्थ्यांना केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे दिलेल्या नियमांचं पालन करत 11 वी इयत्ते प्रवेश देण्यात येणाक आहे. तर, 12 वीच्या परीक्षाही पुढील आदेशांपर्यंत स्थगित असतील असंही राज्य शासनानं सांगितलं आहे. 


दरम्यान, लॉकडाऊन लागू होण्याच्या काही काळ आधीपासूनच मोठ्या प्रमाणात परराज्यांतून मोठ्या संख्येनं पर्यटकांनी हिमाचल गाठलं आहे. काही व्यक्ती येत्या काळात या राज्यात जाण्याच्या बेतात आहेत, अशा सर्वांनी राज्यानं आखून दिलेल्या सर्व नियमांचं पालन करणं बंधनकारक असेल.