नवी दिल्ली: अमरनाथ यात्रेकरुंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, सोशल मीडियावर अनेक फोटो, व्हिडीओ आणि मेसेज व्हायरल होत आहेत. याद्वारे अनेक धक्कादायक दावे केले जात आहेत.


बसचालकाच्या नावावरुन वाद

अमरनाथ यात्रेदरम्यान दहशतवादी हल्ल्यानंतरही बस ड्रायव्हरने धाडस दाखवून अनेकांचा जीव वाचवला. मात्र आता त्याच्या नावावरुन वाद सुरु आहे.

अमरनाथ यात्रेबद्दल तुम्हाला काय माहित आहे?

गुजरातच्या एका मोठ्या दैनिकाचा दाखला देत, बसड्रायव्हरचं नाव सलीम नव्हे तर हर्ष असल्याचा दावा केला जात आहे. दहशतवाद्यांच्या गोळीबारात हर्ष जखमी झाला असून सध्या तो रुग्णालयात असल्याचंही सांगितलं जात आहे.

सोशल मीडियात दावा केला जात आहे की, हर्षने जीवाची बाजी लावून यात्रेकरुंचा जीव वाचवला.

व्हायरल मेसेजमध्ये काय लिहिलं आहे?

गुजरातच्या एका मोठ्या दैनिकाच्या बातमीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बस मालकाचा मुलगा हर्ष देसाई स्वत: बस चालवत होता, असं या बातमीत म्हटलं आहे.

ड्रायव्हिंग करतानाच हर्षला दहशतवाद्यांची गोळी लागल्याचा दावा करण्यात येत आहे.

जवळपास 25 दहशतवाद्यांनी बसला घेरलं. यापैकी एक दहशतवादी बसमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी बसमधील सहायकाने दहशतवाद्याला धक्का देऊन दरवाजा बंद केला. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले. या झटापटीत हर्षलाही गोळी लागली. मात्र सुन्न पडलेल्या हर्षने त्या परिस्थितीतही पाच किमी बस चालवल्याचा दावा या बातमीत केल्याचं सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल मेसेजमागील सत्य काय?

एबीपी न्यूजने व्हायरल मेसेजमागील सत्य जाणण्यासाठी बस ड्रायव्हर सलीम आणि बस मालकाचा मुलगा हर्ष देसाई या दोघांशीही संपर्क साधला.

सलीम म्हणाला, "दहशतवाद्यांनी आमच्यावर हल्ला केल्याचं समजताच, मी दरवाजा बंद करुन, खाली वाकून बस चालवली. मिलिट्री कॅम्पपर्यंत बस आणली. त्यावेळी हर्ष माझ्यासोबत बसला होता, त्यालाही गोळी लागली होती.

हर्ष देसाई म्हणाला, "आम्ही 70-80 च्या स्पीडने जात होतो, त्यावेळी अचानक हल्ला झाला. पहिल्यांदा फटाके फुटत असल्याचा भास झाला, मात्र नंतर मलाही गोळी लागली. त्यावेळी मी सलीमभाईला सांगितलं, गाडी अजिबात थांबवू नको, पळवत राहा, जिथे मिलिट्री कॅम्प दिसेल, तिथेच थांबव. पुढे दोन किलोमीटर गेल्यानंतर आम्हाला मिलिट्री कॅम्प दिसला".

सलीम आणि हर्ष या दोघांची बातचीत केल्यानंतर हे स्पष्ट झालं की, सोशल मीडियावर गुजरातच्या वृत्तपत्राचा दाखला देऊन, जी बातमी व्हायरल केली जात आहे, त्यामध्ये काहीही तथ्य नाही, ती चुकीची आहे.

संबंधित बातम्या

अमरनाथ यात्रेकरुंचे जीव वाचवणाऱ्या सलीमला दोन लाखांचं इनाम

अमरनाथ यात्रेबद्दल तुम्हाला काय माहित आहे? 

या हल्ल्याला केंद्र सरकारनं चोख प्रत्युत्तर द्यावं: ओवेसी