श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या बडगावमध्ये भारतीय सैन्यानं तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलंय. मंगळवारी रात्री झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचे तीन दहशतवादी मारले गेले आहेत. या तीनही दहशतवाद्यांचे मृतदेह सैन्यानं ताब्यात घेतले आहेत.
काश्मीरच्या बडगावमध्ये खात्मा करण्यात आलेल्या जवानांकडे मोठा शस्त्रसाठाही होता. खात्म्यानंतर हा साठा जप्त करण्यात आलाय. अमरनाथ यात्रेकरुंवरील हल्ल्यानंतर सैनिकांनी बडगाम आणि परिसरात सर्च ऑपरेशन सुरु केलं होतं. त्याच दरम्यान हे दहशतवादी आढळले आहे, ज्यानंतर झालेल्या चकमकीत त्यांचा खात्मा करण्यात आलाय.
दरम्यान बडगावसह आसपासच्या परिसरात आणखी दहशतवादी लपले आहेत का, याचा शोध तपास यंत्रणा घेत आहेत. तसंच या खात्मानंतर जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे.
सोमवारी अमरनाथ यात्रेतील भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 7 भाविकांचा मृत्यू झाला, तर 19 भाविक जखमी झाले. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी तातडीची बैठक बोलावली होती. शिवाय, गृहमंत्रालयाची टीमनंही अनंतनागला जाऊन सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली.
अमरनाथ यात्रेतील भाविकांवर दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून, हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये कांवड यात्रेचीही सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
अमरनाथ यात्रेतल्या भाविकांच्या गाडीवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर चोख सुरक्षेत भाविकांचा दुसरा गट रवाना झाला आहे. भाविकांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतरही भाविकांचा उत्साह अजिबात कमी झालेला नाही. काहीही झालं तरी भोलेनाथाचं दर्शन घेणार असल्याचं भाविकांनी म्हटलं आहे.