नवी दिल्ली :‘अन्य पक्षांबरोबर आघाडी करण्यासाठी काँग्रेसकडून एका समितीची स्थापणा करण्यात येईल. हे एकवटलेले विरोधक 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करतील,’ असा विश्वास काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीत व्यक्त केला.


राहुल गांधींच्या नेतृत्वात पहिल्यांदाच काँग्रेस कार्यकारणीची बैठक झाली. यावेळी एखाद्या निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतर कोणत्या पक्षासोबत आघाडी करायची, याबाबतचे सर्व अधिकार राहुल गांधी यांना देण्याचा निर्णय कार्यकारणीने घेतला आहे.

लोकांचा पुन्हा विश्वास जिंकायचा आहे

‘काँग्रेसच्या मतदारांमध्ये वाढ करण्याचं सर्वात मोठं काम आपल्यासमोर आहे. आपल्याला प्रत्येक लोकसभा मतदारसंघात जाऊन जे आपले मतदार नाहीत अशा लोकांचे मन वळवण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहचायला हवं. त्यांचा विश्वास पुन्हा एकदा जिंकायला हवा,’ असं आवाहन राहुल यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं.

भाजप-संघावर टीकास्त्र

‘आपण इतर पक्षांना एकत्र घेऊन आगामी लोकसभा निवडणूक जिंकू शकतो. त्यानंतर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मिळून भारतातील ज्या संस्थांचं नुकसान केलं आहे, त्यांची आपण भरपाई करणार आहोत. हे काम केवळ काँग्रेसच करु शकते,’असं म्हणत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी संघ-भाजपच्या कार्यशैलीवर जोरदार टीका केली.

...तर यूपीए 300 जागा जिंकणार

काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारणीच्या बैठकीत इतर पक्षांसोबत आघाडी करण्यावर आणि त्या महाआघाडीचा राहुल गांधी यांना चेहरा बनवण्यात यावा, या मुद्द्यावर जोर देण्यात आला.

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीबाबत यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मार्गदर्शन केलं. सोनिया गांधींनी सर्व समविचारी पक्षांना एकत्र येण्याचं आवाहन केलं.

दुसरीकडे, महाआघाडी झाल्यास यूपीएला 300 जागा मिळतील, असा दावा पी. चिदंबरम यांनी केला. त्यांच्या मते देशभरात 12 राज्य अशी आहेत, ज्यामध्ये काँग्रेस आणि भाजपची समोरासमोर टक्कर होईल, आणि मजबुतीने लढाई लढल्यास काँग्रेस या 12 राज्यांत 150 जागा मिळवू शकते.