नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतात. आज मोदींनी ट्विटरवर आपल्या फॉलोअर्सच्या ट्वीटला रिप्लाय दिले. अविश्वास प्रस्ताव जिंकल्याबद्दल अनेक फॉलोअर्सनी नरेंद्र मोदी यांना ट्विटर अकाऊंटवर शुभेच्छा दिल्या. यावेळी अनेकांनी नरेंद्र मोदींना काही सल्लेही दिले.
शिल्पी अग्रवाल नावाच्या एका ट्विटर युजरनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थोडंसं आणखी हसण्याचा सल्ला दिला. शिल्पीने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, 'मोदीजी सगळं ठीक आहे, फक्त तुम्ही आणखी हसायला हवं.' या सल्ल्याला पंतप्रधान मोदींनी 'पॉईंट टेकन' असा स्माईलीसहित रिप्लाय दिला.
शोभा नावाच्या एका युजरने मोदीना कर्मयोगी म्हणत, संसदेत केलेल्या भाषणाचं त्यांचं कौतुक केलं. त्यावेळी मोदींनीही शोभा यांचे आभार व्यक्त केले.
अनुभव चतुर्वेदी नावाच्या व्यक्तीने लिहिलं की, नरेंद्र मोदी, 'संसदेतील तुमचं भाषण पाहून मला माझ्या आजोबांची आठवण आली. माझे आजोबा आणि मी तुमचे भाषण एकत्र पाहायचो. त्यांचं 16 जुलैला निधन झालं. त्यांना तुम्ही आणि तुमची इच्छाशक्ती फार आवडायची'. अनुभवच्या ट्वीटला उत्तर देताना मोदी म्हणाले की, 'तुमच्या आजोबांबद्दल ऐकूण दु:ख वाटलं. या दुखद क्षणी माझ्या संवेदना तुमच्यासोबत आहेत.'
अशाप्रकारे मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून अनेकांशी संवाद साधला. मोदी 'मन की बात'मधून महिन्याच्या शेवटच्या रविवारी रेडिओवरून जनतेशी संवाद साधतात. मात्र ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान आपल्याशी बोलतात हा अनुभव अनेकांसाठी सुखावणारा होता.