Manipur Violence: मणिपूरमधील (Manipur) सद्य परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्याकडून शनिवारी (24 जून) रोजी नवी दिल्ली (New Delhi) येथे सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. मणिपूरमध्ये सुरु असलेल्या हिंसाचाराच्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आली आहे. बैठकीसाठी अमित शाह यांच्यासोबत भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा हे देखील संसदेत पोहचले.
ही सर्वपक्षीय बैठक संसदेच्या पुस्तकालय सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मे महिन्याच्या सुरुवातीला हिंसाचारग्रस्त असलेल्या मणिपूर राज्याचा चार दिवसांचा दौरा केला होता. या दौऱ्यादरम्यान त्यांनी मणिपूरमध्ये शांततेचं आवाहन केलं आणि हिंसा करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल अशी सक्त ताकीद देखील दिली होती.
बैठकीत 'हे' नेते सहभागी
या सर्वपक्षीय बैठकीमध्ये भाजपचे अध्यक्ष जे.पी नड्डा, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, केंद्रीय मंत्री नित्यानंद राय, भाजपचे नेता पिनाकी मिश्रा, मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनराड रे संगमा, टीएमसीचे नेते ओ ब्रायन, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे(मार्क्सवादी) खासदार ब्रिटान यांच्यासह अनेक नेते या बैठकीमध्ये सहभागी झाले आहेत. या बैठकीमध्ये केंद्र सरकारकडून सर्वपक्षीय नेत्यांना मणिपूरमधील हिंसाचार आणि त्याच्या कारणांविषयी सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.
बैठकीवर विरोधकांचे टीकास्त्र
परंतु या बैठकीवरुन विरोधी पक्षांनी अनेक सवाल उपस्थित केले आहेत. काँग्रेसने गुरुवारी (22 जून) रोजी म्हटलं होतं की, जे'व्हा पंतप्रधान अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत, तेव्हा ही बैठक बोलावण्यात काय अर्थ आहे.' तसेच पंतप्रधानांनी या हिंसाचारावर अजून देखील मौन पाळले आहे, असा आरोप देखील विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर होत असलेली ही सर्वपक्षीय बैठक महत्त्वाची असल्याचं म्हटलं जात आहे.
भाजपकडून आरोपांना प्रत्युत्तर
भाजपने मात्र विरोधकांच्या आरोपांवर प्रत्युत्तर देखील दिले आहे. भाजपचे आयटी विभागाचे प्रमुख अमित मालविय यांनी मणिपूरमधील हिंसाचारासाठी काँग्रेसला कारणीभूत ठरवले आहे. त्यांनी म्हटलं की, जेव्हा काँग्रेस केंद्रात आणि राज्यात सत्तेमध्ये होता तेव्हाच जातीय तेढ निर्माण करण्यास सुरुवात झाली होती. त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं होतं की, काँग्रेसनेच आधी सर्वपक्षीय बैठक घेण्याची मागणी केली होती आणि आता तेच या बैठकीवर बहिष्कार टाकत आहेत.
सध्या मणिपूरमधील स्थिती भयंकर होत चालल्याचं चित्र आहे. मेतई आणि कुकी या दोन्ही समाजांमध्ये जातीय दंगली सुरु आहेत. या हिंसाचारामध्ये आतापर्यंत जवळपास 100 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या बैठकीत कोणता महत्त्वाचा निर्णय घेण्यात येईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.