Sonam Wangchuk On Climate Fast : सामाजिक कार्यकर्ते, इंजिनिअर आणि इनोव्हेटर सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) हे लडाख (Ladakh) वाचवण्यासाठी आजपासून पाच दिवसांचं उपोषण (Fast) करणार आहेत. बॉलिवूडचा सुपरहिट चित्रपट '3 इडियट्स'मध्ये आमीर खानने साकारलेली रणछोडदास छांछड उर्फ ​​'रँचो' ही व्यक्तिरेखा सोनम वांगचुक यांच्याकडून प्रेरित होती. या चित्रपटातील 'ऑल इज वेल' हा डायलॉग खूप प्रसिद्ध झाला, पण आज खुद्द सोनम वांगचुक हेच 'लडाखमध्ये ऑल इज नॉट वेल' म्हणजेच लडाखमध्ये सर्व काही ठीक नाही असं म्हणत आहेत.


मॅगसेसे पुरस्कार विजेते सोनम वांगचुक यांनी अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून एक व्हिडीओ मेसेज पोस्ट केला होता की लडाखमधील परिस्थिती चांगली नाही. कारण इथल्या सुमारे दोन तृतीयांश हिमनद्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, असा दावा अभ्यासात करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये सोनम वांगचुक हे लडाखच्या आदिवासी, उद्योग आणि हिमनद्यांविषयी बोलताना दिसत आहेत. भारतीय संविधानाच्या सहाव्या अनुसूची अंतर्गत नाजूक इकोसिस्टमचे रक्षण करण्यासाठी हस्तक्षेप करण्याची विनंती वांगचुक यांनी पंतप्रधान मोदींना केली आहे.


'जगलो तर पुन्हा भेटेन'


या व्हिडीओमध्ये सोनम वांगचुक यांनी असंही म्हटलं आहे की, "26 जानेवारीपासून पाच दिवसांचं लाक्षणिक उपोषण करणार आहे, जेणेकरुन हा मुद्दा मांडता येईल. पंतप्रधान मोदींना उद्देशून ते म्हणाले की, खारदुंग ला इथे उणे 40 अंश तापमानात उपवास केल्यानंतर मी वाचलो तर मी तुम्हाला पुन्हा भेटेन. 'सिंगल यूज प्लास्टिक'वर बंदी आणल्याबद्दल वांगचुक यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केलं आहे.


'लडाख सहाव्या शेड्यूलमध्ये का नाही?'


लडाखचा सहाव्या अनुसूचीमध्ये समावेश करण्याची मागणी करताना वांगचुक म्हणाले की, "एखाद्या भागातील 50 टक्के लोकसंख्या आदिवासी असेल तर त्याचा अनुसूची 6 मध्ये समावेश केला जाईल, असं म्हटलं आहे, परंतु लडाखमध्ये 95 टक्के लोकसंख्या आदिवासी आहे. तरीही ते अद्याप त्यांचा समावेश सहाव्या अनुसूचीमध्ये केलेला नाही. ते म्हणाले की, लडाखचा वारसा जपण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील, असं आश्वासन केंद्रीय आदिवासी मंत्री अर्जुन मुंडा यांनी दिलं होते. सहाव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्याची इच्छा ही लडाखच्या लोकांच्या मन की बात आहे, असंही वांगचुक यांनी म्हटलं.


लडाखच्या लोकांना आश्चर्य'


सरकार या मागणीकडे लक्ष देत नसल्याने लडाखचे लोक आश्चर्य व्यक्त करत असल्याचं वांगचुक म्हणतात. लडाखमध्ये व्यवसाय वाढीसह येणाऱ्या समस्यांबद्दल चिंता व्यक्त करताना ते म्हणाले की, "यामुळे पाण्यासह मर्यादित स्त्रोतांवर भार वाढेल.  खाणकाम आणि अशा प्रकारच्या कामांमुळे हिमनद्या वितळू शकतात."