मुंबई: जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर आता देशभरात संतापाची लाट उसळली आहे. आम्हाला फक्त निषेध नको, तर कारवाई करा अशाच भावना देशवासिय व्यक्त करत आहे.


अनंतनागमध्ये झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात 7 भाविकांचा मृत्यू झाला, तर 19 जण जकमी आहेत. मृतांमध्ये महाराष्ट्रातल्या डहाणूच्या 2 तर गुजरातमधील वलसाडच्या 5 भाविकांचा समावेश आहे.

दरवर्षी अमरनाथ यात्रेसाठी देशभरातून अनेक भाविक जातात. मात्र या यात्रेचं महत्त्व काय? अमरनाथ यात्रेच्या अख्यायिका काय? याबाबतचा स्पेशल रिपोर्ट -

अमरनाथ यात्रेचं महत्त्व

हिंदू भाविकांच्या पवित्र स्थानांपैकी एक म्हणजे अमरनाथ होय. जम्मू काश्मीरमधील अनंतनाग परिसरातील बालाटल क्षेत्रात अमरनाथ गुहा आहे. या गुहेत बर्फाचं शिवलिंग असतं आणि ते थंडीच्या वातावरणातच आकार घेतं. आषाढ पौर्णिमा ते रक्षाबंधन-नारळी पौर्णिमेपर्यंत हे शिवलिंग पूर्ण आकार घेतं. त्यामुळे या काळात शिवलिंगाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते.

यंदा 29 जून ते 7 ऑगस्ट यात्रा

या शिवलिंगाच्या दर्शनासाठी हजारो भाविक दरवर्षी रजिस्ट्रेशन करतात. यंदा 29 जून ते 7 ऑगस्ट 2017 पर्यंत ही यात्रा चालणार आहे.  यावर्षी 2 लाख 30 हजार यात्रेकरुंनी नोंदणी केली होती. यंदा 29 जून रोजी सुरु झालेली अमरनाथ यात्रा 40 दिवस चालू राहील. रक्षाबंधनला अमरनाथ यात्रा पूर्ण होईल.

समुद्र सपाटीपासून हजारो फूट उंच

अमरनाथ गुफा ही समुद्र सपाटीपासून 3,888 मीटर म्हणजेच सुमारे 12 हजार 756 फूट उंचावर आहे. इथपर्यंत जाण्यासाठी एकतर पायीच जावं लागतं किंवा खेचरांचा आधार घ्यावा लागतो.

दक्षिण काश्मीरमधील पहलगावपासून हे अंतर सुमारे 46 किमी आहे. म्हणजेच अमरनाथ गुहेपर्यंत तब्बल 46 किमी चालत जावं लागतं. यासाठी पाच दिवस लागू शकतात.

या यात्रेसाठी दुसरा रस्ता सोनमर्गच्या बालटालवरुनही आहे. इथून अमरनाथ गुहेचं अंतर केवळ 16 किमी आहे. मात्र उभी चढण असल्याने हा प्रवास अत्यंत कठीण मानला जातो.

पाकचा इस्माईल अमरनाथ हल्ल्याचा मास्टरमाईंड

ही गुहा नेहमीच बर्फाने झाकोळलेली असते.  मात्र थंडी ओसरल्यानंतर हळूहळू बर्फ वितळून गुहेचं तोंड उघडतं. त्याचवेळी भाविक इथे येतात.

श्रावण महिन्याच्या आस-पास यात्रा सुरु होते. साधारण 45 दिवसांपर्यंत ही यात्रा असते.

ही यात्रा नेमकी कधी सुरु झाली, त्याबाबतची ठोस माहिती उपलब्ध नाही. गेल्या 20 वर्षात या यात्रेचं प्रस्थ वाढलं आहे.

त्यामुळे 2000 मध्ये अमरनाथ यात्रा समितीची स्थापना करण्यात आली. ही समितीच या यात्रेचं आयोजन करते.

अमरनाथ गुहेची अख्यायिका

भगवान शंकराने याच गुहेत आपलं अस्तित्व आणि अमरत्वाबाबतचं रहस्य पार्वतीला सांगितल्याची अख्यायिका आहे. या गुहेचा उल्लेख काश्मीरी इतिहासकार कल्हण यांनी 12व्या शतकात रचलेलं महाकाव्य 'राजतरंगिणी'तमध्येही आहे.

या गुहेच्या छतातून थेंब थेंब पाणी गळतं तेच पाणी गोठून एक विशालकाय रुप धारण करतं. याचा आकार शिवलिंगाप्रमाणे असतो, त्यामुळे हिंदू भाविक दरवर्षी इथे दर्शनासाठी येतात.

भाविकांना सुविधा

अमरनाथ यात्रा समितीकडून यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांचा विमा उतरवला जातो. यात्रेदरम्यान दुर्घटना होऊन मृत्यू झाल्यास 1 लाखापर्यंतचा विमा दिला जातो. मात्र यासाठी यात्रा सुरु होण्यापूर्वी रजिस्ट्रेशन आवश्यक असतं.

हे रजिस्ट्रेशन काही बँकांच्या अधिकृत शाखांमध्येच करता येतं. यात्रेकरुंसाठी शेषनाग, पंचतरणी याठिकाणी सरकार स्टॉल उभारतं. या स्टॉलमध्ये भाविकांना आवश्यक असलेल्या वस्तू ठेवल्या जातात. राशन, लाकूडसामान, तंबू उभारण्यासाठी भाड्याचं साहित्य अशा विविध सुविधा पुरवल्या जातात.

संबंधित बातम्या

अनेक यात्रेकरुंचे जीव वाचवणाऱ्या ड्रायव्हर सलीमला सलाम!

…तेव्हा बाळासाहेबांमुळे अमरनाथ यात्रा पार पडली होती : संजय राऊत 

अमरनाथ यात्रेकरुंवरील हल्ल्यावर वीरुचं संवेदनशील ट्विट 

पाकचा इस्माईल अमरनाथ हल्ल्याचा मास्टरमाईंड

अमरनाथ हल्ला : पालघरमधील 2, तर गुजरातमधील 5 भाविकांचा मृत्यू