नवी दिल्ली : अमरनाथ यात्रेतील भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात 7 भाविकांचा मृत्यू झाला, तर 19 भाविक जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर देशभर हाय अलर्ट जारी करण्यात आला. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत तातडीची उच्चस्तरीय बैठक पार पडली.

राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी अमरनाथ हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सव्वा तास चर्चा झाली. या बैठकीत गुप्तचर यंत्रणेचे संचालक, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, गृहसचिव, केंद्रीय गृहमंत्रालयाचे अधिकारी हजर होते.

उच्चस्तरीय बैठकीत या पाच मुद्द्यांवर चर्चा झाली :

1. दहशतवाद्यांविरोधात जॉईंट ऑपरेशन करुन त्यांचा खात्मा करावा. सुरक्षा यंत्रणांनी शोधमोहीम सुरु केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

2. नोंदणीकृत नसलेल्या गाड्या आणि भाविकांवर यात्रेदरम्यान  नजर ठेवावी. त्याचसोबत, अमरनाथ यात्रेवरुन परतणाऱ्यांवर नजर ठेववी.

3. गृहमंत्रालयातील सूत्रांच्या माहितीनुसार, अमरनाथ यात्रेची सुरक्षा व्यवस्था अधिक सुदृढ करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी ड्रोनद्वारे नजर ठेवण्याचे आदेश गृहमंत्रालयाने सीआरपीएफला दिले आहेत. सीआरपीएफ डीजी आर आर भटनागर हे काश्मिरात जाऊन अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेची पाहणी करुन गृहमंत्री राजनाथ सिंह यांना अहवाल सादर करतील.

4. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनाही जम्मू-काश्मिरात जाण्यास सांगितले आहे. आज (11 जुलै) दुपारी 3 वाजता गृहराज्यमंत्री दिल्लीहून काश्मीरला रवाना होतील. तिथे जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सुरक्षा यंत्रणांसोबत ते चर्चा करतील.

5. रियल टाईम अॅक्शनेबल इंटेलिजेन्स इनपुटला आणखी मजबूत करण्यासोबतच दहशतवाद्यांच्या हालचाली गृहमंत्रालयाला सांगण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली.