लखनौ : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आपण आगामी लोकसभा निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. कन्नौज मतदारसंघातून ते निवडणूक लढवतील. या मतदारसंघात सध्या अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव खासदार आहेत.

डिंपल यादव यांच्यापूर्वी या जागेवर सपाचे नेते जनेश्वर मिश्र निवडणूक लढवायचे. कन्नौज जनेश्वर मिश्र यांचा मतदारसंघ होता. त्यामुळे आपल्यालाही तिथूनच निवडणूक लढण्याची संधी मिळावी, असं अखिलेश यादव म्हणाले. एवढंच नाही, तर सपाचे संस्थापक मुलायम सिंह यादव मैनपुरीतून लोकसभा निवडणूक लढवतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

कन्नौज मतदारसंघ मुलायम सिंह यादव यांच्या समाजवादी पक्षाचा गड मानला जातो. या लोकसभा मतदारसंघात तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाला 80 पैकी केवळ 5 जागांवर विजय मिळवता आला होता. जिंकणाऱ्या सदस्यांमध्ये मुलायम सिंह यादव आणि त्यांच्याच कुटुंबातील सदस्य होते.

दरम्यान, 2009 च्या लोकसभा निवडणुकीत अखिलेश यादव यांनी कन्नौज मतदारसंघातून निवडणूक लढवत विजय मिळवला होता. त्या निवडणुकीत कन्नौज आणि फिरोजाबादमधून त्यांनी विजय मिळवला होता. नंतर अखिलेश यादव यांनी फिरोजाबादची जागा सोडली.

या जागेवर पतीने विजय मिळवल्यानंतर डिंपल यादव यांनी निवडणूक लढवली. मात्र काँग्रेसचे वरिष्ठ नेते राज बब्बर यांनी यांनी डिंपल यादव यांचा पराभव केला. 2012 साली मुख्यमंत्री झाल्यानंतर अखिलेश यादव यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. या ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीत डिंपल यादव यांनी विजय मिळवला.