नवी दिल्ली: बँकिग क्षेत्रात क्रांती आणणाऱ्या जगातल्या पहिल्या एटीएमची सुरूवात आजच्याच दिवशी झाली. न्यूयॉर्कमधील केमिकल बँकेने पहिले एटीएम बाजारात आणले. भारताच्या इतिहासात आज आणखी एक महत्त्वाची घटना घडली. गुजरात विजयाच्या स्मरणार्थ मुघल सम्राट अकबरने आजच्याच दिवशी फत्तेपूर सिक्री या ठिकाणी बुलंद दरवाजाची निर्मिती केली. तसेच भारतीय जलतरणपटी बुला चौधरीने आजच्याच दिवशी दुसऱ्यांना इंग्लिश खाडी पोहून पार केली. 


देशाच्या आणि जगाच्या इतिहासात 2 सप्टेंबर या तारखेला घडलेल्या इतर काही महत्त्वाच्या घटनांचा क्रमवार तपशील पुढीलप्रमाणे आहे.


1573:  अकबरने गुजरात जिंकल्यानंतर बुलंद दरवाजा बांधला


बुलंद दरवाजा (Buland Darwaza) हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील आग्रा शहरापासून 43 किमी अंतरावर फतेहपूर सिक्री येथे स्थित एक निसर्गरम्य स्मारक आहे. गुजरात जिंकल्याच्या स्मरणार्थ सन 1571 मध्ये अकबराने याची निर्मिती केली होती. हिंदू आणि पर्शियन स्थापत्यकलेचे अप्रतिम उदाहरण असल्याने याला "गेट ऑफ ग्रँड्यूअर" असेही म्हटले जाते.


बुलंद दरवाजाच्या प्रवेशद्वाराच्या पूर्वेकडील कमानीमध्ये पर्शियन भाषेतील शिलालेख आहेत. त्यावर 1571 सालच्या अकबराच्या दख्खनवर विजयाच्या नोंदी आहेत.  बुलंद दरवाजा 53.63 मीटर उंच आणि 35 मीटर रुंद आहे. तो पांढर्‍या संगमरवरी सजवलेल्या लाल वाळूच्या दगडापासून बनवलेला आहे. दरवाज्यासमोर आणि खांबांवर कुराणातील आयते कोरलेली आहेत. अष्टकोनी आकाराचा हा दरवाजा घुमट आणि मिनारांनी सजलेला आहे. दरवाजाच्या कमानीवर येशू ख्रिस्ताशी संबंधित बायबलमधील काही ओळी लिहिल्या आहेत ज्या पुढीलप्रमाणे आहेत. अकबराच्या धार्मिक सहिष्णुतेच्या धोरणावर त्यामुळे प्रकाश पडतो. 


1775: जनरल जॉर्ज वॉशिंग्टन यांनी पहिले अमेरिकन युद्ध जहाज 'हाना' लाँच केले.


1789: अमेरिकेत महसूल विभागाची निर्मिती झाली. अलेक्झांडर हॅमिल्टन पहिला मंत्री झाला.


1806: भूस्खलनामुळे स्वित्झर्लंडचे संपूर्ण शहर उद्ध्वस्त झाले, 457 लोक मरण पावले.


1926: इटली आणि येमेन यांच्यात एक करार करण्यात आला. त्यानुसार इटलीला लाल समुद्राच्या किनाऱ्यावर वर्चस्व मिळाले.


1930: युरोप ते अमेरिकेचे पहिले थेट उड्डाण करण्यात आले.


1945: जपानने पराभव स्वीकारल्यानंतर दुसरे महायुद्ध संपले.


1946: जवाहरलाल नेहरू यांच्या उपाध्यक्षतेखाली भारताच्या अंतरिम सरकारची स्थापना.


1956: हैदराबादपासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या जडचेरळा आणि मेहबूब नगर दरम्यान पूल कोसळून 125 जणांचा मृत्यू झाला.


1962: सोव्हिएत युनियनने क्युबाला शस्त्रे देण्याचे मान्य केले.


1969: जगातील पहिले ATM मशिन न्यूयॉर्क येथे सुरू 


2 सप्टेंबर ही जगातील बँकिंग क्षेत्रात क्रांती घडवणारी तारीख आहे. जगातील सर्वात पहिले एटीएम ( ATM Automated Teller machine) हे आजच्याच दिवसी न्यूयॉर्कमध्ये सुरू झालं. जॉन शेफर्ड बेरन (John Shepherd-Barron) याला एटीएमच्या शोधाचा जनक मानलं जातं. न्यूयॉर्कमधील केमिकल बँकेने प्रथम एटीएम मशीनची स्थापना केली. बँकेने हे मशीन लॉन्च करण्यापूर्वी जाहिरात केली होती, 'आमची बँक 2 सप्टेंबर रोजी सकाळी 9:00 वाजता उघडेल आणि कधीही बंद होणार नाही'. केमिकल बँकेची ही जाहिरात पाहून लोकांना धक्काच बसला. ते विचार करू लागले की आता केमिकल बँक 24 तास सात दिवस उघडणार का? केमिकल बँकेने जगातील पहिले एटीएम सुरू केले होते आणि याच एटीएमची ही जाहिरात होती.


सुरुवातीला एटीएम मशीनमधून पैसे काढण्यासाठी कार्डऐवजी चेक वापरावा लागत होता. या चेकला एक किरणोत्सर्गी पदार्थ जोडलेला असायचा जो मशीनच्या स्कॅनरने वाचला जायचा. चेकसोबत मशीनमध्ये 6 अंकी पिन टाकावा लागायचा. नंतर हा सहा अंका क्रमांक कमी करून तो चार अंकी करण्यात आला.


1990: सोव्हिएत प्रवासी जहाज काळ्या समुद्रात बुडाल्याने 79 प्रवासी मरण पावले.


1992: अमेरिका आणि रशियाने स्पेस स्टेशन बांधण्यासाठी संयुक्त उपक्रम तयार करण्याचे मान्य केले.


1996: 26 वर्षांच्या गृहयुद्धानंतर मुस्लिम बंडखोर आणि फिलिपिन्स सरकारने शांती करारावर स्वाक्षरी केली.


1998: पायलटविरहित प्रशिक्षण विमान 'निशांत'ने यशस्वीपणे उड्डाण केले.


1999 : बुला चौधरीने दुसऱ्यांदा इग्लिश खाडी पार केली, पहिली आशियाई महिला ठरली 


भारतीय जलतरणपटू बुला चौधरी (Bula Choudhury) हिने 2 सप्टेंबर 1999 रोजी दुसऱ्यांदा इंग्लिश खाडी (English Channel) ओलांडण्याचा मान मिळवला. अशी कामगिरी करणारी ती आशियातील पहिलीच महिला जलतरणपटू ठरली. 2 जानेवारी 1970 रोजी कलकत्ता येथे जन्मलेल्या बुला चौधरी ही एक अप्रतिम महिला लांब पल्ल्याची जलतरणपटू आहे. तिने पाच महाद्वीपातील सात समुद्र पोहून पार केले आहेत. 'अर्जुन पुरस्कार'ने सन्मानित बुला चौधरीला 'जल परी' ही पदवी देण्यात आली. तिने दोनदा इंग्लिश चॅनल ओलांडली आहे. 2003 मध्ये 'ध्यानचंद जीवनगौरव' पुरस्काराने सन्मानित बुला हिचे पूर्ण नाव बुला चौधरी चक्रवर्ती आहे. तिला पद्मश्री पुरस्कारानेही गौरवण्यात आलं असून ती 2006 ते 2011 या काळात पश्चिम बंगालच्या विधानसभेत आमदार म्हणून निवडून आली होती.


2001: 1967 मध्ये जगातील पहिले हृदय प्रत्यारोपण करणारे दक्षिण आफ्रिकेतील अग्रगण्य हृदयरोग तज्ञ ख्रिश्चन बर्नार्ड यांचे निधन.


ही बातमी वाचा: