मुंबई: राज्यातील दोन्ही आघाड्यांच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटत नसल्याने अनेकांचा जीव टांगणीला लागल्याचं दिसतंय. त्यातच भाजप 32 जागा लढवणार असून शिंदे आणि अजित पवार गटाला (Ajit Pawar) एकेरी अंकावर समाधान मानाव लागणार असल्याचं दिसतंय. अजित पवार गटानेही त्याची तयारी ठेवली असून त्यांनी दहाच जागांची मागणी केल्याचं समोर येतंय. राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये या दहा जागांवरील उमेदवारांच्या नावांची चर्चादेखील झाल्याची माहिती आहे. 


महायुतीच्या जागावाटप बैठकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून दोन दिवसीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये राष्ट्रवादी कोणत्या जागेवर लढणार, कोणत्या ठिकाणी पक्षाची स्थिती चांगली आहे आणि त्यासाठी कोण उमेदवार निवडणूक लढवू शकतो याची चर्चा करण्यात आली.


राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून बारामतीमधून सुनेत्रा पवार, शिरूरमधून विलास लांडे तर साताऱ्यातून नितीन पाटील यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे. तसचे रायगडमधून सुनील तटकरे यांचे तिकीट फायनल असल्याची माहिती आहे.  


राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मागणी केलेले उमेदवार


दिंडोरी- जयश्री पवार


उस्मानाबाद - सुरेश बिराजदार 


सातारा - नितीन पाटील


शिरूर- विलास लांडे


बारामती - सुनेत्रा पवार


रायगड - सुनील तटकरे


गडचिरोली- बाबा अत्राम 


बुलढाणा - राजेंद्र शिंगणे


परभणी - राजेश विटेकर


शिंदे गटासह अजित पवारांना एक अंकी जागा मिळण्याची शक्यता 


राज्यातील महायुतीच्या जागावाटपाचा अंतिम निर्णय या आठवड्याच्या अखेरपर्यंत होणार असल्याची माहिती आहे. त्यामध्ये भाजपकडून 48 पैकी 32 जागा लढवण्याची तयारी असल्याचंही समोर आलं आहे. त्यामुळे उर्वरित 16 जागांमध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार आणि शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाला समाधान मानावं लागण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे दोन्ही गटांना एक अंकी जागांवर निवडणूक लढवावी लागण्याची शक्यता आहे. 


एकनाथ शिंदे गटाकडून सुरूवातीला जरी 18 जागांची मागणी करण्यात येत असली तरी आता किमान 13 जागा तरी आपल्याला मिळाव्यात अशी मागणी होत असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे सध्या 13 खासदार असून त्यांचा जीव टांगणीला लागला आहे.  


अजित पवार गट या दहा जागांवर ठाम 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस धाराशिव, परभणी, बुलढाणा, गडचिरोली, माढा, हिंगोली, बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड या लोकसभेच्या किमान 10 जागांवर निवडणूक लढवण्यास ठाम आहे.


ही बातमी वाचा: 



  • Loksabha Election 2024: भाजप मुंबईतील लोकसभेच्या 5 जागा लढवणार, अमित शाहांनी आशिष शेलारांकडून रिपोर्ट मागवला?