'ती'च को-पायलट हवी, एअर इंडियाच्या पायलटने 2 तास विमान थांबवलं
एबीपी माझा वेब टीम | 07 Apr 2016 04:29 PM (IST)
नवी दिल्ली : आपल्या आवडीच्या महिला को-पायलटसाठी अडून बसलेल्या वैमानिकाला आडमुठेपणा महागात पडण्याची शक्यता आहे. 'ती'च्यासाठी दोन तास प्रवाशांना ताटकळत ठेवणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बुधवारी चेन्नईहून माले येथे जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाच्या पायलटने आवडत्या महिला को-पायलटसाठी तब्बल दोन तास विमान थांबवून ठेवले. या विमानात 110 प्रवासी असल्याची माहिती आहे. ही फ्लाईट तिरुअनंतपुरम मार्गे चेन्नईहून मालेला जाणार होती. एअर इंडियाच्या चेअरमन आणि एमडी अश्वनी लोहानी यांनी पत्रकाद्वारे अशी वर्तणूक खपवून घेतली जाणार नसल्याचं सांगितलं आहे. संबंधित वैमानिकाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल, असंही एअर इंडियातर्फे सांगण्यात आलं.