Air India News: नवी दिल्लीहून (Navi Delhi) अमेरिकेला जाणारं एअर इंडियाचं (Air India) विमान इंजिनमधील तांत्रिक बिघाडामुळे रशियातील मगादन (Magadan airport) विमानतळावर उतरवण्यात आलंय. या विमानात 216 प्रवासी आहेत आणि 16 कर्मचारी आहेत. एअर इंडियाचं AI173 हे अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोला जाणारं विमान इंजिनातील बिघाडामुळे वैमानिकांनी रशियाकडे (Russia) वळवलं आणि तिथल्या मगादन विमानतळावर ते सुखरुप उतरवण्यात आलं. टाटा समुहाच्या मालकीच्या इअर इंडियाच्या वतीने जारी प्रसिद्धीपत्रकात ही माहिती देण्यात आलीय. या विमानात अडकलेल्या प्रवाशांना स्थानिक पातळीवर सर्व मदत पोहोचवली जात असल्याचंही एअर इंडियाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलंय. रशियात अडकलेल्या विमानातील प्रवाशांच्या पुढील प्रवासासाठी भारतातून एक खास विमान रशियाला रवाना करण्यात आलंय. भारतातून रशियातील मगादनसाठी दुपारी एक वाजता विशेष विमान रवाना करण्यात आलं. हे विमान मुंबईतून निघालं असल्याची माहिती एअर इंडियाच्या वतीने देण्यात आली. 


रशियातील मगादान विमानतळावर इमर्जन्सी लँडिग करण्यात आलेल्या या विमानातील सर्व प्रवासी सुखरुप आहेत, तसंच त्यांना विमानतळावरील स्थानिक कर्मचाऱ्यांकडून सर्व ती मदत केली जात असल्याचं एअर इंडियाच्या वतीने सांगण्यात आलंय. तसंच या विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना स्थानिक हॉटेलमध्ये मुक्कामांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.  


स्थानिक विमानतळ तंत्रज्ञांकडून विमानातील बिघाडाचा तपास केला जात आहे.   


दरम्यान, अमेरिकेतून आलेल्या वृत्तानुसार, अमेरिका प्रशासन रशियात उतरण्यात आलेल्या भारतीय विमानाचे सर्व अपडेट घेत आहे तसंच परिस्थितीवर लक्ष ठेऊन असल्याचं सांगण्यात आलंय. रशियाचं युक्रेसोबत युद्ध सुरु आहे, त्यामुळे अमेरिका आणि युरोपीय युनियनकडून रशियावर काही निर्बंध घालण्यात आले आहेत. 


भारतातून अमेरिकेला जाणाऱ्या या विमानात काही अमेरिकन नागरिक असण्याचीही शक्यता आहे, त्यामुळे अमेरिकेचं परराष्ट्र मंत्रालय रशियातील या भारतीय विमानाच्या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाचे उपप्रवक्ते वेदांत पटेल यांनी सांगितलं की, त्यांना बिघाड झालेल्या विमानातून नेमके किती अमेरिकी नागरीक प्रवास करत होते, याची माहिती उपलब्ध झालेली नाही, तरीही तिथल्या परिस्थितीवर त्याचं लक्ष आहे. 


रशियातील मगादन विमानतळावर उतरवण्यात आलेल्या एअर इंडियाच्या विमानातील प्रवाशांच्या पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आलेल्या खास विमानात औषधे तसंच आवश्यक सामुग्रीही पाठवण्यात आली आहे. 


मगादन हा रशियाच्या अतिपूर्वेकडील कोलिमा प्रांतातील एक विमानतळ आहे. या प्रदेशातील सामान्य तापमान हे उणे 19 ते उणे 38 दरम्यान असतं. हा परिसर सोने, चांदी आणि तांबे वगैरे धातूंच्या उत्खननासाठी ओळखला जातो तसंच मगादन हे या प्रांतातील मुख्य शहर आहे.  या विमानतळावर एअर इंडियाचे कुणीही कर्मचारी नियुक्त नाहीत, त्यामुळे स्थानिक प्रशासनाकडून आवश्यक ती मदत मिळवली जात आहे.