Monsoon Update: मान्सूनचं आगमन बऱ्यापैकी लांबताना दिसतंय . खरं तर दरवर्षी मान्सूनचं आगमन थोडं पुढे मागे होतंच असतं . पण यावेळी मॉन्सूनचं आगमन जास्तच लांबल्यानं त्याचे परिणाम येत्या काही दिवसांत जाणवायला लागणार आहेत . मान्सूनचं आगमन लांबण्याची कारणं काय आहेत? ज्या वर्षी मान्सूनचं आगमन खूप दिवसांनी लांबलाय त्या वर्षी पावसाचं एकूण प्रमाण किती होतं? आणि ती सगळी वर्षं दुष्काळी ठरली का असे एका ना अनेक प्रश्न सध्या विचारले जात आहे. या सर्व प्रश्नांबद्दल नेमकं हवामान तज्ज्ञांच काय मत आहे हे जाणून घेणार आहोत.
प्रत्येक वर्षीचा मान्सून स्वतःची वेगळी वैशिष्ट्य घेऊन येतो. पण यावेळचा मान्सून थोडा जास्तच वेगळा ठरण्याची शक्यता आहे. कारण एरवी 7 जूनला महाराष्ट्रात पोहचणारा मान्सून अजून केरळातच पोहचलेला नाही . मान्सूनने अंदमान आणि निकोबार बेटे पार केली पण त्याचवेळी बंगालच्या उपसागरात आलेल्या मोखा चक्रीवादळाने मान्सून अडखळला तो आजतागायत आहे. तर इकडे अरबी समुद्रात निर्माण झालेल्या बिपॉर्जोय या चक्रीवादळाने अरबी समुद्रातून येणाऱ्या मॉन्सूनचा मार्ग रोखून धरला आहे
मान्सून दरवर्षी मे च्या शेवटी किंवा जूनच्या सुरुवातीला केरळात पोहचतो . सात जूनपर्यंत तो महाराष्ट्रात येतो आणि जुलै महिन्यापर्यंत तो संपूर्ण देश व्यापतो . गेली शेकडो वर्ष मान्सूनचा हा शिरस्ता सुरू आहे पण ज्या ज्या वर्षी त्यामध्ये खंड पडलाय त्या त्या वर्षी दुष्काळ आणि पाणी टंचाईच्या रूपाने देशात मोठी उलथापालथ पाहायला मिळालीय .
गेल्या काही दशकातील मान्सूनच्या आगमनाच्या तारखा पाहिल्या तर आपल्याला दिसून येतं की,
- 1972 ला मान्सूनचं आगमन खूपच लांबलं होतं. त्यावर्षी मान्सून 18 जूनला केरळात तर 25 जूनला महाराष्ट्रात पोहचला होता. 1972 च हे वर्ष भीषण दुष्काळाचं म्हणून आजही ओळखलं जातं .
- 2003 ला देखील केरळात मान्सून यायला 8 जून उजाडला होता तर आणि ते वर्ष दुष्काळाचं ठरलं होतं.
- पण याचा अर्थ मान्सून उशिरा आलेली प्रत्येक वर्षं दुष्काळी ठरली आहेत किंवा मान्सून वेळेवर आल्यावर त्या वर्षी दुष्काळ पडलेच नाहीत असं नाही. 2012, 2015 आणि 2016 यावर्षी मान्सूनचं आगमन वेळेवर झालं होतं. मात्र त्यावर्षी महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता .
हवामान विभागाकडून दिली जाणारी आकडेवारी अनेकदा गोंधळ निर्माण करणारी ठरते . भारतासारख्या खंडप्राय देशात मॉन्सून जर 870 मिलीमीटर पडला तर तो सरासरीएवढा पडला असं मानलं जातं . पण मान्सूनचं हे सरासरी ओलांडणं फसवं ठरतं . कारण एकाच वर्षी भारतात काही राज्यात महापुराने हाहाकार उडालेला असतो तर दुसरीकडे काही राज्यात भीषण दुष्काळात जनता होरपळत असते . एकाच राज्याच्या वेगवगेळ्या भागांमध्ये देखील पावसाचं हे व्यस्त प्रमाण पाहायला मिळतं . यावर्षी हवामान विभागाने मान्सून सरासरीच्या 94 टक्के पडेल असा अंदाज वर्तवलाय . पण तो सगळीकडे सारखाच पडेल याची शाश्वती कोणीच देऊ शकत नाही .
गेल्या काही वर्षांमध्ये मान्सूनचं येणं जरी उशिराने होत असलं तरी त्याच परतणं लांबताना दिसतंय . आधी 30 सप्टेंबरला परतणारा मॉन्सून हल्ली ऑक्टोबरमध्ये ठाण मांडून असतो. गेली काही वर्षी महाराष्ट्रात याच महिन्यात परतीच्या मान्सूनने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालंय .
मान्सूनचं येणं , त्याची प्रगती आणि त्याच परतणं याचा सखोल अभ्यास हवामान विभागाकडून केला जातो. अनेकदा हवामान विभागाचे अंदाज बरोबर ठरतात तर काहीवेळा मात्र मान्सून चांगलाच चकवा देतो . यावर्षी मान्सूनचं लांबलेलं मान्सूनचं आगमन काय परिणाम करणार आहे याबाबत आत्ताच अंदाज बांधणं अवघड आहे. मात्र टंचाईचा धोका लक्षात घेता त्याच नियोजन आतापासूनच करण्याची गरज आहे .
भारतासारख्या खंडप्राय देशात मान्सूनमध्ये झालेला छोटासा बदलही मोठे परिणाम करणारा ठरतो . मान्सूननं दिलेला चकवा अनेक अर्थांनी आपल्याला महागात पडतो आणि त्याचे सर्वंकष परिणाम जाणवतात . हवामान विभाग या मॉन्सूनचा माग काढत अंदाज बांधण्याचं काम करतो खरा पण त्या अंदाजांच्या आधारे अनेकदा नियोजन होत नाही . पण एखाद्यावर्षी मान्सून खूपच लांबला तर हवामान विभागाच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करणं चांगलंच महागात पडू शकतं .