AI News Anchor Interview: सध्या AI-आधारित पत्रकारितेचं युग उदयास येत आहे. पत्रकारितेतील क्षेत्रात प्रथमच AI अँकरने एका मंत्र्याची मुलाखत घेतली आहे. केरळचे सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटन मंत्री, पी. ए. मुहम्मद रियास यांची एका AI न्यूज अँकरने मुलाखत घेतली आहे. Channeliam.com द्वारे आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम बातम्यांच्या निर्मितीमध्ये AI तंत्रज्ञानाचा (Artificial Intelligence) वापर करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल आहे.


केरळच्या न्यूज पोर्टलने घेतली मुलाखत


निशा कृष्णन यांनी स्थापन केलेल्या Channeliam.com या डिजिटल न्यूज मीडिया स्टार्ट-अपने ही AI मुलाखत घेण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. केरळमध्ये 2016 मध्ये या चॅनलचं डिजिटल पोर्टल सुरु झालं होतं. या स्टार्ट-अप पोर्टलने या ऐतिहासिक मुलाखतीच्या कार्यक्रमाचं आयोजन करुन मीडिया युगात महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे.Channeliam.com च्या सीईओ आणि संस्थापक निशा कृष्णन यांनी पत्रकारितेच्या या अभिनव दृष्टिकोनाबद्दल उत्साह व्यक्त केला. 


देशातील पहिली AI न्यूज अँकर


Channeliam.com या डिजिटल न्यूज पोर्टलने भारतातील पहिली AI न्यूज अँकर 'प्रगती' हिची देशाला ओळख करुन दिली. प्रगती या AI न्यूज अँकरने केरळचे सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटन मंत्री, पी. ए. मुहम्मद रियास यांची अभूतपूर्व मुलाखत घेतली. या मुलाखतीत केरळमध्ये उदयाला येत असलेलं तंत्रज्ञान आणि रोबोटिक्समधील केरळची प्रगती यासह विविध विषयांवर चर्चा झाली. 


लवकरच AI पत्रकारितेचं युग


आजच्या काळात AI न्यूज अँकर म्हटलं की लोकांना नवल वाटतं आणि त्यांचं वृत्तनिवेदन पाहण्यासाठी अनेकजण आसुसलेले असतात. एखाद्या न्यूज चॅनलवर AI अँकर बातम्या देत असल्याचं समजलं तरी लोक लगेच यूट्यूबवर जाऊन किंवा टीव्हीवर वृत्तनिवेदन ऐकतात. पण येत्या काळात हे सगळं अगदी सामान्य होणार आहे. सध्याच्या युगात माणसांची जागा देखील तंत्रज्ञानाने घेतली आहे, या अवगत प्रणालीचा अनुभव आपल्याला येत्या काळात सहज मिळू शकतो. AI आणि पत्रकारितेचं हे अनोखं संयोजन एका रोमांचक युगाची पहाट दर्शवते, ज्यामध्ये पारंपारिक वृत्त माध्यमांना ठळकपणे मांडण्याची क्षमता आहे.


AI न्यूज अँकर म्हणजे काय?


AI अँकर हे एक कृत्रिम बुद्धिमत्ता असणारे न्यूज अँकर असतात. हे अँकर बातम्या वाचण्यास आणि प्रसारित करण्यास सक्षम असतात. मानवी वृत्तनिवेदकांसारखे असणारे हे वृत्तनिवेदक प्रत्यक्षात मात्र पूर्णपणे वेगळे असतात. इतर वृत्तनिवेदकांच्या तुलनेत AI वृत्तनिवेदक हे अधिक वेगवान आणि अचूक असतात. तसेच ते चोवीस तास न थकता काम करु शकतात. अगदी कमी खर्चात बातम्या प्रसारित करण्यास AI न्यूज अँकरमुळे मदत होऊ शकते. 


हेही वाचा:


ABP AI Anchor Aira : एबीपी नेटवर्कची पहिली AI अँकर, दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एबीपी देसम डिजिटल चॅनलची प्रेक्षकांना अनोखी भेट