Ahmedabad Hospital Fire: गुजरातमधील (Gujarat) अहमदाबाद शहरात असलेल्या रुग्णालयाच्या बेसमेंटमध्ये आग लागली, त्यानंतर 125 रुगणांना सुखरुप रुग्णालयातून बाहेर काढण्यात आलं आहे. प्राथमिक माहितीनुसार, शहरातील साहिबाग परिसरात असलेल्या राजस्थान रुग्णालयाच्या (Rajasthan Hospital Fire) बेसमेंटमध्ये पहाटे 4.30 वाजता आग लागली. रुग्णालयामध्ये सुरु असलेल्या नुतनीकरणाच्या कामामुळे बेसमेंटमध्ये ठेवलेल्या अनेक वस्तूंना आग लागली आणि मोठ्या प्रमाणात धूर झाला, असं अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितलं.


रुग्णालयाच्या बेसमेंटमध्ये लागली आग


सध्या आग आटोक्यात आणण्यात आली आहे. अग्निशमन दलाच्या 20-25 गाड्या घटनास्थळी हजर आहेत. रुग्णालयाच्या बेसमेंटमध्ये लागलेल्या आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अग्निशमन अधिकारी जयेश खाडिया यांनी सांगितलं की, राजस्थान रुग्णालयाच्या तळघरात पहाटे साडेचार वाजता आग लागली आणि या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.


आगीत कोणतीही जीवितहानी नाही


रुग्णालयात काही पुनर्बांधणीचं काम सुरु होतं, या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. रुग्णांनाही सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. अग्निशमन दलाच्या 20 ते 25 गाड्या घटनास्थळी हजर असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.


बेसमेंटमध्ये ठेवलेल्या वस्तूंना आग


शाहीबाग पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर एमडी चंपावत यांनी सांगितलं की, बेसमेंटमध्ये सुरु असलेल्या नुतनीकरणाच्या कामामुळे बेसमेंटमध्ये ठेवलेल्या वस्तूंना आग लागली, त्यामुळे बेसमेंटमध्ये धुराचे प्रचंड लोट पसरले. राजस्थान रुग्णालय हे एका चॅरिटेबल ट्रस्टद्वारे चालवलं जात आहे.


धुरामुळे रुग्णांना श्वास घेण्यास होत होता त्रास


बेसमेंटला लागलेल्या आगीमुळे रुग्णालयाच्या वरच्या मजल्यावर धुराचे लोट पसरले होते, त्यामुळे रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत होता. बेसमेंटमध्ये लागलेली आग वरील मजल्यांपर्यंत भडकली. त्यानंतर लगेच खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णांना रुग्णालयातून बाहेर काढून दुसर्‍या रुग्णालयात हलवण्यात आलं, आता त्यांच्यावर सुरळीत उपचार सुरु आहेत.






दिल्लीतही घडला होता असाच प्रकार


यापूर्वी पश्चिम दिल्लीतील जनकपुरी भागातही एका रुग्णालयात आगीची घटना घडली होती. रुग्णालयाच्या बेसमेंटमधील काही फर्निचरला आग लागल्याने इमारतीमध्ये धुराचे लोट पसरले. रुग्णालयात उपस्थित असलेल्या 20 नवजात बालकांना तात्काळ वाचवण्यात आलं होतं आणि त्यांना इतर रुग्णालयात पाठवण्यात आलं. सुमारे तासाभरानंतर ती आग देखील आटोक्यात आणण्यात आली होती.


हेही वाचा:


Rain Update: विदर्भासह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; पाहा तुमच्या भागातील पावसाची आजची स्थिती