Ahmedabad Serial Blast : 2008 च्या अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोटात दोषी आढळलेल्या 49 जणांपैकी 38 जणांना फाशी देण्यात आली आणि 11 जणांना अहमदाबाद न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 26 जुलै 2008 रोजी 21 ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटात 56 ठार आणि सुमारे 260 लोक जखमी झाले. एकूण 77 आरोपींवर न्यायालयात खटला चालवण्यात आला आणि त्यातील 49 जणांना दोषी ठरवण्यात आलं, तर पुराव्याअभावी 28 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. इंडियन मुजाहिद्दीनने या स्फोटांची जबाबदारी घेतली होती. 


अहमदाबादच्या विशेष न्यायालयानं सुनावलेला हा निर्णय आतापर्यंतचा ऐतिहासिक निकाल आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच 49 दोषींच्या शिक्षेवर सुनावणी पार पडली. तसेच, एकाच वेळी 38 जणांना फाशी सुनावण्यात आली असून हेदेखील पहिल्यांदाच घडलं आहे. तसेच, उर्वरित 11 जणांना जन्मठेप सुनावण्यात आली आहे. 


अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोटात 78 आरोपी होते. एक आरोपी नंतर सरकारी साक्षीदार झाला. त्यामुळे एकूण 77 आरोपी होते. तब्बल 13 वर्ष चाललेल्या खटल्यात 1,163 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. पोलीस आणि कायदेशीर यंत्रणांनी 6 हजारांहून अधिक पुरावे सादर केले होते. 


अहमदाबादच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अंबालाल पटेल यांनी 6,752 पानांच्या निकालात 49 आरोपींना दोषी ठरवलं होतं, तर पुराव्याअभावी 28 जणांची निर्दोष मुक्तता केली होती. दहशतवादाच्या आरोपात एकाच वेळी 49 आरोपींना शिक्षा होण्याची ही पहिलीच वेळ आहे. दोषींना आयपीसी कलम 302 (हत्या) आणि UAPA अंतर्गत दोषी ठरवण्यात आले आहे.


70 मिनिटांत 21 बॉम्बस्फोट 


26 जुलै 2008 रोजी अहमदाबादमध्ये संध्याकाळी 6.45 वाजता पहिला बॉम्बस्फोट झाला. मणिनगरमध्ये हा स्फोट झाला. मणिनगर हा तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ होता. यानंतर 70 मिनिटं आणखी 20 बॉम्बस्फोट झाले. या स्फोटांमध्ये 56 जणांचा मृत्यू झाला असून 200 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. 2002 मधील गोध्रा घटनेचा बदला घेण्यासाठी इंडियन मुजाहिद्दीनने हे बॉम्बस्फोट घडवून आणले होते.


दहशतवाद्यांनी टिफिनमध्ये बॉम्ब टाकून तो सायकलवर ठेवला होता. हे स्फोट गर्दीच्या आणि बाजारपेठेत झाले. इंडियन मुजाहिदीन (IM) आणि स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (SIMI) यांच्याशी संबंधित दहशतवाद्यांचा या स्फोटांमध्ये सहभाग होता. स्फोटांच्या 5 मिनिटांपूर्वी दहशतवाद्यांनी वृत्तसंस्थांना एक मेलही पाठवला होता. ज्यामध्ये 'तुम्हाला जे हवे ते करा, थांबवता येत असेल तर थांबवा."  असं लिहिलं होतं.