देशातल्या गहू क्रांतीचं जनक दिलबाग सिंग यांचं निधन
एबीपी माझा वेब टीम | 17 May 2017 07:57 PM (IST)
नवी दिल्ली : कृषीशास्त्रज्ञ डॉ. दिलबाग सिंग अठवाल यांचं अमेरिकेतल्या न्यू जर्सी इथं निधन झालं. ते 89 वर्षाचे होते. त्यांना देशातल्या गहू क्रांतीचं जनक मानलं जात असे. पंजाबच्या जालंधरमधील लांबडाजळच्या कल्याणपूर गावात जन्मलेल्या डॉ. अठवाल यांनी कृषी क्षेत्रात महत्त्वाचं संशोधन केलं होतं. बायोलॉजिकल सायन्समधील त्यांच्या उल्लेखनीय कार्यबद्दल त्यांना 1975 मध्ये भारत सरकारने पद्मभूषण पुरस्कारानं गौरवलं होतं. हरित क्रांतीच्या काळात देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवणाऱ्या शास्त्रज्ञापैकी डॉ.अठवाल महत्वाचे बुरुज होते. साठच्या दशकात मेक्सिकोतून आयात केलेल्या गव्हावर डॉ. अठवाल यांनी संशोधन केलं होतं. त्यांनी गव्हाच्या पीवी १८ आणि कल्याण या जास्त उत्पादन देणाऱ्या जाती विकसित केल्या. डॉ. अठवाल यांनी पंजाबमध्ये गव्हावर संशोधन केलं नसतं, तर आज आपल्याला मेक्सिकन गव्हाच्या लाल भडक रंगाच्या पोळ्या खाव्या लागल्या असत्या. डॉ. अठवाल यांच्या निधनानं देशातील हरित क्रांतीचा शिलेदार, साक्षीदार आणि जादूगार गेल्याचं मानलं जातं.