Cotton Candy Banned : तुम्ही बऱ्याचदा 'बुढ्ढी के बाल' म्हणजेच कॉटन कॅंडी (Cotton Candy), कापसाचा गोळा जत्रेत किंवा बाजारात विकताना पाहिले असतील. विशेषत: मुलांना या गोड कॅंडीची विशेष आवड असते. जर तुमची मुलंही 'बुढ्ढी के बाल' खाण्याचे शौकीन असतील तर तुम्ही काळजी घ्यावी लागणार आहे. कारण या मुलांच्या आवडत्या कॅंडीमध्ये कर्करोग (Cancer) निर्माण करणारी रसायने आढळून आली आहेत. या गोड पदार्थाला इंग्रजीत 'कॉटन कँडी' म्हणतात. एका रिपोर्टनुसार, अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत या मिठाईमध्ये रोडामाइन-बी रसायन आढळले आहे. हे रसायन कापड उद्योगात वापरले जाते. या रसायनामुळे शरीरात कर्करोग होण्याचा धोका असतो. त्यामुळेच या संदर्भातील माहिती समोर आल्यानंतर दोन राज्यांनी यावर बंदी घातली आहे.



...म्हणून या राज्यांनी रंगीबेरंगी कॉटन कॅंडीच्या विक्रीवर बंदी घातली


तामिळनाडू सरकारने रंगीबेरंगी कॉटन मिठाईच्या विक्रीवर बंदी घातली आहे. कारण कॅन्सरला कारणीभूत ठरणारे रसायन Rhodamine-B यामध्ये आढळून आले आहे. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी रसायनाच्या उपस्थितीची पुष्टी केल्यानंतर ही बंदी घातली आहे. Rhodamine-B सामान्यतः कापड उद्योगात वापरले जाते. ही माहिती समोर आल्यनंतर पुद्दुचेरीतही कॉटन कँडीवरही बंदी घालण्यात आली होती. आरोग्य मंत्री एम सुब्रमण्यम यांनी ही बंदीची घोषणा केली. 


 



कॉटन कँडी शरीरासाठी किती हानिकारक आहे?


आरोग्य अधिकाऱ्यांनी कॉटन कॅंडीच्या नमुन्यांची तपासणी केल्यानंतर, त्यात रोडामाइन-बी नावाचे रसायन वापरले जात असल्याचे आढळून आले. साधारणपणे या रसायनाचा वापर चामड्याचा रंग आणि छपाईसाठी केला जातो. हे रसायन आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. याच्या सेवनामुळे पोट फुगणे, खाज येणे, श्वास घेण्यास त्रास होणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. तर त्याचे दीर्घकाळ सेवन केल्याने मूत्रपिंड, यकृत आणि आतड्यांचे गंभीर नुकसान होऊ शकते. काहीवेळा यातून कर्करोगासारखे प्राणघातक आजारही होऊ शकतात.


 


अनेक हॉटेल्सवर कारवाई


आरोग्य सचिव गगनदीप सिंग बेदी यांनी राज्यभरातील अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना रंग असलेल्या सर्व खाद्यपदार्थांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी नियमित तपासणी, नमुना चाचणी आणि योग्य ती कारवाई केली जाईल. मांसाहारी भोजनालयांच्या अलीकडील तपासणीत असे आढळून आले की 10,000 पेक्षा जास्त भोजनालयपैकी 167 भोजनालय खराब झालेले अन्न विकत आहेत. या उपाहारगृहांना नोटिसा बजावण्यात आल्या असून त्यांना दंड ठोठावण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, शाकाहारी भोजनालयांमध्ये, 20,000 पेक्षा जास्त भोजनालयपैकी 229 नियमांचे पालन न करणारे आढळले आणि त्यांना दंड ठोठावण्यात आला.


 


 


हेही वाचा>>>


'अकबर' आणि 'सीता' नावाच्या सिंह-सिंहिणीचे प्रकरण चक्क उच्च न्यायालयात पोहोचले! नावावर आक्षेप, याचिका दाखल