नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या सुमार कामगिरीनंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. कपिल सिब्बल यांच्यानंतर आता ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनीही पक्षाला घरचा आहेर दिला आहे. त्यांनी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर नाव न घेता निशाणा साधत त्यांचा 'नया लडका' असा उल्लेख केला आहे.
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी बिहारमधील पक्षाच्या पराभवावरुन पक्ष नेतृत्वाला घरचा आहेर दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, "कॉंग्रेसने आपला पाया गमावला आहे." तसेच पक्षाच्या नेतृत्वाचा कार्यकर्त्यांशी संपर्क तुटला असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. 'नया लडका' असा राहुल गांधींचा उल्लेख करुन त्यांनी त्यांच्यावरही टीका केली.
कॉंग्रेसच्या सध्याच्या अवस्थेवर बोलताना गुलाम नबी आझाद म्हणाले की, "कॉंग्रेस पक्ष सध्या सर्वात खालच्या स्तरावर उभा आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा कार्यकर्त्यांसोबतचा संपर्क तुटला आहे. फाईव्ह स्टार हॉटेलात बैठका घेऊन निवडणुका लढवता येत नाहीत."
या आधी पक्षाचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनीही पक्ष नेतृत्वावर टीका केली होती. ते म्हणाले होते की, "2019 सालच्या लोकसभेतील पक्षाच्या कामगिरीनंतर राहुल गांधी यांनी अध्यक्षपदी न राहण्याचा निर्णय घेतला होता. राहुल गांधींनी असेही म्हटले होते की या पदावर गांधी परिवारातील कोणताही सदस्य असू नये. अशा परिस्थितीत दीड वर्षानंतरही एखादा पक्ष अध्यक्षाविना कसे काय काम करु शकेल?"
या वर्षाच्या अखेरीस म्हणजे डिसेंबरमध्ये कॉग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची निवड होण्याची शक्यता आहे. अध्यक्षपदावरुन याआधीही पक्षात अनेकदा वाद झाला आहे. कॉंग्रेसच्या 23 वरिष्ठ नेत्यांनी पक्ष नेतृत्वाला पत्र लिहून अनेक मुद्द्यावर टीका केली होती. त्या पत्रात असं लिहलं होतं की, "राहुल गांधी यांना आमचा मुळीच विरोध नाही, पण जो कोणी अध्यक्ष असेल तो पूर्णवेळ असावा, त्याने लोकांना भेटावे, कोणताही इश्यू असेल तर त्या अध्यक्षासोबत चर्चा करत येऊ शकेल, पक्ष संघटनेला वेळ द्यावा. राहुल गांधी यांनी राजीनामा मागे घेतला तर चांगली गोष्ट, आता हंगामी अध्यक्ष आहे त्याऐवजी पूर्ण वेळ अध्यक्ष असावा, सोनिया गांधी यांनी ती जबाबदारी स्वीकारली तरी पाठिंबा, राहुल गांधी यांनी स्वीकारली तरी पाठिंबा आहे." या पत्रावरुनही मोठा वाद झाला होता. राहुल गांधींनी त्याला उत्तर देताना सांगितले होते की या नेत्यांनी भाजपशी संधान बांधलंय.
बिहारमध्ये कॉंग्रेसच्या अगदीच सुमार कामगिरीमुळे महागठबंधनला अवघ्या काहीच जागांनी सत्ता गमवावी लागली. या निवडणुकीत राहुल गांधी यांनी प्रमुख भूमिका बजावली होती. त्याचा पक्षाला काहीच फायदा झाला नाही. कॉंग्रेसला गेल्या वेळच्या जागाही टिकवता आल्या नाहीत. तेव्हापासून कॉंग्रेसमधील अंतर्गत वाद बाहेर येत आहेत.
पहा व्हिडीओ: Kapil Sibal | लोकांना आमच्याकडून अपेक्षा उरल्या नाहीत : कपिल सिब्बल
महत्वाच्या बातम्या:
- महाविकास आघाडीच्या बैठकीत बॅनरवर सुशीलकुमार शिंदेंचा फोटो नसल्याने शिंदे समर्थक आक्रमक
- CWC Meeting | राहुल गांधींच्या नाराजीच्या वृत्तावर सुरजेवालांचं स्पष्टीकरण; कपिल सिब्बल यांच्याकडून ट्वीट डिलीट
- CWC Meeting | पत्र लिहिणाऱ्या 23 नेत्यांवर राहुल गांधी यांची कठोर शब्दात नाराजी, कपिल सिब्बल यांचं ट्विटरवर उत्तर