सोलापूर : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ महाविकास आघडीची बैठक आज सोलापुरात पार पडली. महाविकास आघाडीच्या या बैठकीत सुशीलकुमार शिंदे समर्थक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. बैठकीत  बॅनरवर सुशीलकुमार शिंदे यांचा फोटो नसल्याने समर्थकांनी गोंधळ घातल्याचं समोर आलं आहे. यावरुन पुन्हा एकदा काँग्रेसमधील नाराजी नाट्य उघडकीस झालं आहे.


सुशीलकुमार शिंदे समर्थकांच्या गोंधळानंतर राज्यमंत्री सतेज पाटील स्वत: खाली उतरले. काही काळ बैठकीत एकचं गोंधळ उडालेला पाहायला मिळाला. सुशीलकुमार शिंदे समर्थकांनी जोरदार नारेबाजी करत जलसंपदामंत्री जयंत पाटील, उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्यासमोर निषेध नोंदवला.


कार्यकर्त्यांची एकच मागणी होती की, सोलापूर मतदारसंघ हा विद्यमान आमदार प्रणिती शिंदे यांचा मतदारसंघ आहे. किमान त्यांचा तरी फोटो बॅनरवर असणं अपेक्षित होतं. मात्र कोणताही फोटो या बॅनरवर नसल्याने समर्थकांनी गोंधळ घातल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर स्वत: राज्यमंत्री सतेज पाटील यांनी घडल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करत कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. त्यानंतर गोंधळ निवळला.


सुशीलकुमार शिंदे यांचा फोटो अनावधानाने राहिला : उदय सामंत


बैठकीत  बॅनरवर सुशीलकुमार शिंदे यांचा फोटो अनावधानाने राहिला असल्याचं उदय सामंत यांनी सागिंतलं. शिंदे साहेब आमच्या सर्वांच्या मनात असून, ज्या मग्रूरीने भाजप काम करत आहे त्याला नेस्तनाबूत करण्यासाठी आम्ही तिघे एकत्रित असल्याचही उदय सामंत म्हणाले.


पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ महाविकास आघडीची बैठक आज सोलापुरात पार पडली. या बैठकीला जलसंपदामंत्री जयंत पाटील, उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री सतेज पाटील, दत्तात्रय भरणे, डॉ. विश्वजित कदम उपस्थित होते.


पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ सोलापूर शहर आणि ग्रामीण भागातील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.