नवी दिल्ली: आगामी नवीन वर्षाच्या सुरुवातीला भारतासाठी कोरोनाच्या लसीसंबंधी दिलासादायक बातमी मिळणार आहे. जानेवारी महिन्याच्या शेवटपर्यंत देशात ऑक्सफर्डची लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या लसीची उपलब्धता सर्वप्रथम डॉक्टर्स, नर्स, पोलीस तसेच कोरोनासंबंधी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. केंद्र सरकार पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) ला कोरोनाच्या लसीच्या वापरासंबंधी आपत्कालीन मंजुरी देण्याची शक्यता आहे.


सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या डिसेंबरच्या अखेरपर्यंत केंद्र सरकारकडे आपत्कालीन मंजुरीसाठी अर्ज करण्याची शक्यता आहे. कंपनीने याआधीच तसं स्पष्ट केलं आहे. कोरोनाच्या लसीच्या खरेदीसंबंधी केंद्र सरकार लस निर्मीती कंपन्यांशी अंतिम चर्चा करत असल्याचे वृत्त आहे.


भारत सरकारला अर्ध्या किंमतीत कोरोना लस उपलब्ध होणार
ऑक्सफर्डच्या लसीची बाजारपेठेतील किंमत ही 500 ते 600 रुपये असण्याची शक्यता आहे. भारतीय लोकसंख्या लक्षात घेता केंद्र सरकार या लसीची खरेदी मोठ्या प्रमाणात करणार असल्याने सरकारला ही लस 225 ते 300 रुपयाला उपलब्ध होण्याची शक्यता आहे. भारत सरकार सर्वसामान्यांना ही लस लवकरात लवकर उपलब्ध करुन देण्याच्या प्रयत्नात आहे. भविष्यात सार्वजनिक लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत या लसीचे मोफत वाटपही होण्याची शक्यता आहे.


भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनलाही मंजुरी मिळण्याची शक्यता
भारत बायोटेकनेही पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील लसीच्या चाचणीचे परीक्षण पूर्ण केले आहे. यामुळे भारत बायोटेकलाही लसीच्या आपत्कालीन चाचणीसाठी मंजूरी मिळण्याची शक्यता आहे. कंपनीतर्फे आता तिसऱ्या टप्प्यातील चाचणीची माहिती प्रकाशित करण्यात येणार आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भारत बायोटेकची लस फेब्रुवारीपर्यंत बाजारात येईल असे एका अधिकाऱ्याने सांगितले.


मार्च अखेरीस एकापेक्षा जास्त लसींची उपलब्धता शक्य
सीरम इन्स्टिट्यूटने ब्रिटनमध्ये त्यांच्या लसीच्या प्रभावासंबंधी माहिती जमा केल्यानंतर भारतात त्याच्या आपत्कालीन वापरासंबंधी विनंती केल्यास केंद्र सरकार त्याला मंजुरी देण्याची शक्यता आहे. भारत बायोटेकच्या बाबतीतही केंद्र सरकार असा विचार करु शकते. असे घडले तर मार्च अखेरपर्यंत भारतात एकापेक्षा जास्त कोरोनाच्या लसींची उपलब्धता होण्याची शक्यता आहे.


महत्वाच्या बातम्या: