नवी दिल्ली : काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीआधी काँग्रेसच्या 23 नेत्यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रावरुन आधीच वाद निर्माण झाला असताना, आजच्या बैठकीतून बाहेर आलेल्या काही माहितीमुळे याची परिसीमा गाठली. 23 नेत्यांनी पत्र लिहून एकप्रकारे भाजपशी संधान बांधलं, अशा कठोर शब्दात राहुल गांधी यांनी बैठकीत नाराजी व्यक्त केल्याचं म्हटलं जात होतं. त्यानंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी राहुल गांधींना थेट ट्विटरवर उत्तर दिलं. यामुळे पक्षातील वादविवाद समोर आले. मात्र त्यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांना कपिल सिब्बल यांच्या ट्वीटला कोट करु राहुल गांधी यांनी अशाप्रकारचं कोणतंही वक्तव्य केलं नसल्याचं सांगूत मीडियातील चुकीच्या वृत्तांना आणि माहितीला बळी पडू नका, असं आवाहन केलं. मग काही वेळात सिब्बल यांनी राहुल गांधींना उत्तर दिलेलं ट्वीट डिलीट केलं.


राहुल गांधींनी कठोर शब्दात नाराजी व्यक्त केल्याची चर्चा


काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल गांधी यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिणाऱ्या 23 नेत्यांवर नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली. "इच्छा नसतानाही सोनिया गांधी काँग्रेसचं हंगामी अध्यक्षपद स्वीकारलं. त्या रुग्णालयात असताना प्रश्न उपस्थित करणं किती योग्य आहे?," अशा कठोर शब्दात राहुल गांधी यांनी सवाल विचारले. या पत्रामुळे 23 नेते भाजपसोबत एकप्रकारे हातमिळवणी केल्याचं राहुल गांधी म्हणाले, अशी माहिती होती.


कपिल सिब्बल यांचं ट्विटरवरुन उत्तर


राहुल गांधी यांनी प्रश्न विचारल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी थेट ट्वीट करुनच त्यांना उत्तर दिलं. कपिल सिब्बल यांनी लिहिलं आहे की, "राहुल गांधी म्हणतात आम्ही भाजपशी संधान साधलं. राजस्थान हायकोर्टात काँग्रेसची बाजू मांडली. भाजपला सत्तेतून पायउतार करण्यासाठी पक्षाला मदत केली. मागील तीन वर्षात कोणत्याही विषयावर भाजपच्या बाजूने वक्तव्य केलं नाही. तरीही आम्ही भाजपला मदत करतोय!"






गुलाम नबी आझादही भडकले


तर दुसरीकडे भाजपशी हातमिळवणी करत असल्याचा आरोप सिद्ध झाला तर राजीनामा देईन, असा पवित्रा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी घेतला आहे. गुलाम नबी आझाद हे काँग्रेसचे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आहेत.


राहुल गांधींनी असं कोणतंही वक्तव्य केलं नाही, बळी पडू नका : रणदीप सिंह सुरजेवाला


दरम्यान कपिल सिब्बल यांच्या ट्वीटला काँग्रसेचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी उत्तर दिलं. राहुल गांधी यांना अशाप्रकारचं कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. मीडियातील चुकीच्या वृत्ताने आणि माहितीला बळी पडू नका, असं सुरजेवाला म्हणाले.

त्यांनी लिहिलं आहे की, "राहुल गांधी यांनी अशा आशयाचा कोणताही शब्द उच्चारला नाही किंवा संगनमत केल्याचंही म्हटलेलं नाही. मीडियात पसरलेल्या चुकीच्या वृत्त आणि माहितीने दिशाभूल होऊ नका. पण हो, एकमेकांशी वाद घालण्यापेक्षा आणि दुखावण्यापेक्षा आपल्याला एकत्र येऊन मोदींच्या राजवटीविरुद्ध लढण्याचं काम केलं पाहिजे."


कपिल सिब्बल यांच्याकडून ट्वीट डिलीट

दरम्यान यानंतर कपिल सिब्बल यांनी आधीचं ट्वीट डिलीट करुन स्पष्टीकरण दिलं आहे. "राहुल गांधी यांनी वैयक्तिकरित्या संवाद साधून आपण असं काहीही म्हटलं नसल्याचं सांगितलं. त्यामुळे मी माझं आधीचं ट्वीट डिलीट करत आहे," असं कपिल सिब्बल यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.


संबंधित बातम्या


CWC Meeting | पत्र लिहिणाऱ्या 23 नेत्यांवर राहुल गांधी यांची कठोर शब्दात नाराजी, कपिल सिब्बल यांचं ट्विटरवर उत्तर


मला हंगामी अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करुन नव्या अध्यक्षाची निवड करा : सोनिया गांधी


सोनिया गांधींना पत्र लिहिणाऱ्या 'त्या' 23 नेत्यांची भूमिका समोर


काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी वर्किंग कमिटीच्या बैठकीत आज अध्यक्षपदाचा राजीनामा देणार? 


...तर वासनिक, चव्हाण, देवरांना राज्यात फिरु देणार नाही; काँग्रेसचेच मंत्री सुनील केदार यांचा धमकीवजा इशारा