Land For Job Case : नोकरीच्या बदल्यात जमीन प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) आरोपपत्राची दखल घेत दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने आरोपी बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी राबडी देवी, तसेच मिसा भारती, हेमा यादव, हृदयानंद चौधरी आणि इतरांना समन्स बजावले आहे. मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रावर हे समन्स बजावण्यात आले आहे.
जमिनीच्या बदल्यात नोकरी प्रकरणात पहिले आरोपपत्र
राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने सर्व आरोपींना 9 फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी ईडीने 4751 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. लँड फॉर जॉब प्रकरणात ईडीचे हे पहिले आरोपपत्र आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने एकूण सात जणांना आरोपी केले आहे. सात आरोपींमध्ये राबडी देवी, मिसा भारती, हेमा यादव, हृदयानंद चौधरी, अमित कात्याल आणि दोन कंपन्या एके इन्फोसिस्टम आणि एबी एक्सपोर्ट यांचा समावेश आहे. याप्रकरणी सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने 18 जानेवारी रोजी निर्णय राखून ठेवला होता. यानंतर 20 जानेवारीला निर्णय येणार होता, मात्र त्या दिवशी निर्णय झाला नाही. या निर्णयासाठी 27 जानेवारी ही नवीन तारीख जाहीर करण्यात आली होती.
ईडीने कोर्टात काय सांगितले?
सुनावणीदरम्यान ईडीने सांगितले की, आरोपी अमित कात्यालने 2006-07 मध्ये एके इन्फोसिस्टम नावाची कंपनी स्थापन केली होती. कंपनी आयटीशी संबंधित होती. कंपनीने प्रत्यक्षात कोणताही व्यवसाय केला नसून अनेक भूखंड खरेदी केल्याचे ईडीने न्यायालयाला सांगितले होते. यातील एक भूखंड नोकरीसाठी जमीन घोटाळ्यातून संपादित करण्यात आला होता.
निर्यात व्यवसाय करण्यासाठी एबी कंपनीची स्थापना
हीच कंपनी 2014 मध्ये राबडी देवी आणि तेजस्वी यादव यांच्या नावावर एक लाख रुपयांना हस्तांतरित करण्यात आली होती. तर, निर्यात व्यवसाय करण्यासाठी एबी एक्सपोर्ट कंपनीची स्थापना 1996 मध्ये करण्यात आली. 2007 मध्ये एबी एक्सपोर्ट कंपनीने पाच कंपन्यांकडून 5 कोटी रुपये मिळवून न्यू फ्रेंड्स कॉलनीत एक मालमत्ता खरेदी केली. या प्रकरणात सात भूखंड गुंतल्याचे ईडीने न्यायालयाला सांगितले. यापैकी राबडी देवी, हेमा यादव आणि मिसा भारती यांनी भूखंड घेतले, नंतर हे भूखंड विकले गेले. या प्रकरणी फक्त अमित कात्याललाच अटक करण्यात आल्याचे ईडीने न्यायालयाला सांगितले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या