नवी दिल्ली : रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी (BJP leader LK Advani) यांची प्रकृती स्थिर आहे आणि ते घरीच आराम करत आहेत. माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना काल (5 जुलै) सायंकाळी पाच वाजता दिल्लीतील अपोलो रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. 96 वर्षीय अडवाणी यांची प्रकृती खालावल्याने बुधवारी रात्री 9 वाजता त्यांना रुग्णालयात आणण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाने बुलेटिन जारी केले होते. ते न्यूरोलॉजिस्ट डॉ. विनीत सुरी यांच्या निरीक्षणाखाली होते.


सात दिवसांपूर्वी आधी 26 जून रोजी अडवाणींना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यांना यूरोलॉजी विभागाचे डॉ. अमलेश सेठ यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले. अडवाणी यांच्यावर किरकोळ शस्त्रक्रिया झाल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.






अडवाणी यांना 31 मार्च रोजी भारतरत्न प्रदान


लालकृष्ण अडवाणी यांना 31 मार्च रोजी देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या घरी भेट देऊन त्यांना भारतरत्न देऊन सन्मानित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखर, गृहमंत्री अमित शहा आणि माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू उपस्थित होते. 3 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदींनी त्यांना भारतरत्न देण्याची घोषणा केली होती. यापूर्वी 2015 मध्ये अडवाणी यांना देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले होते.


एनडीएच्या विजयानंतर मोदी अडवाणींना भेटले


2024 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएच्या सलग तिसऱ्या विजयाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 जून रोजी लालकृष्ण अडवाणी यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी अडवाणींना पुष्पगुच्छ अर्पण केला.लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी जाहीर झाला. यामध्ये भाजपला 240 जागा मिळाल्या. मित्रपक्षांसह, एनडीएला एकूण 293 जागा मिळाल्या आणि केंद्रात सरकार स्थापन केले.


अडवाणी हे भाजपचे संस्थापक सदस्य आणि 7वे उपपंतप्रधान


अडवाणी यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1927 रोजी कराची येथे झाला. 2002 ते 2004 दरम्यान ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमधील 7 वे उपपंतप्रधान होते. याआधी ते 1998 ते 2004 दरम्यान एनडीए सरकारमध्ये गृहमंत्री होते. ते भाजपच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या