नवी दिल्ली :  सामान्य नागरिकांना अच्छे दिन येवो अथवा न येवो लोकांचे प्रतिनिधी असलेल्या खासदारांना मात्र अच्छे दिन आल्याचे समोर आले आहे. कारण सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा निवडून आलेल्या 153 खासदारांच्या संपत्तीत 142 टक्क्यांची वाढ झाली आहे. इलेक्शन वॉच अँड असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर)च्या सर्व्हेमध्ये ही माहिती समोर आली आहे. यामध्ये शॉटगन म्हणून प्रसिध्द असलेले खासदार शत्रुघ्न सिन्हा, पिनाकी मिश्रा आणि सुप्रिया सुळे हे टॉपर ठरले आहेत.


वर्ष 2014 मध्ये संसदेत आलेल्या 153 खासदारांची सरासरी संपत्ती 142 टक्के वाढ झाली आहे.  सन 2009 ते 2014  या पाच वर्षांमध्ये 153 खासदारांच्या संपत्तीत सरासरी 7 कोटी 81 लाखांची वाढ झाली आहे. यात शत्रुघ्न सिन्हा यांची संपत्ती सर्वात जलद गतीने वाढली आहे. सन 2009 मध्ये शत्रुघ्न सिन्हा यांची संपत्ती सुमारे 15 कोटी रुपये इतकी होती. सन 2014 मध्ये त्या संपत्तीत वाढ होऊन ती 131 कोटी रुपयांवर गेली.

या खासदारांच्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. 2009 मध्ये त्यांची संपत्ती 51 कोटी रुपये होती, ही संपत्ती 2014 मध्ये वाढून 113 कोटी रुपये झाली आहे. तर बीजू जनता दलाच्या (बीजेडी) पिनाकी मिश्रा यांची यांची संपत्ती 107 कोटींची होती. त्यात वाढ होत ती 137 कोटींवर पोहोचली आहे.

एडीआरच्या पाहणीनुसार, 2009 ते 2014 या पाच वर्षांमध्ये 153 खासदारांच्या संपत्तीत सरासरी 7  कोटी 81 लाखांची वाढ झाली आहे.  पुन्हा निवडून आलेल्या या खासदारांची सन 2009 मध्ये सरासरी संपत्ती 5.50 कोटी होती.  यात दुपटीने वाढ होऊन ती सरासरी 13.32 कोटी इतकी झाली. संपत्तीत सर्वाधिक वाढ होणाऱ्या पहिल्या दहा खासदारांमध्ये अकाली दलाच्या हरसिमरत कौर बादल सहाव्या स्थानी, तर वरुण गांधी दहाव्या स्थानी आहेत.