मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबध अधिक तणावग्रस्त झाल्यानंतर पाकिस्तानच्या (Pakistan) कलाकार आणि खेळाडूंना मुंबईत, भारतात प्रवेश देऊ नये. तसेच, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामनेही रद्द करावे अशी भूमिका दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेची राहिली आहे. आता, शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हेही आपल्या आजोबांचा वारसा पुढे नेताना दिसत आहे. पहलगाम (Pahalgaum) येथील हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये घुसून चोख प्रत्युत्तर दिलं. भारत आणइ पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य परिस्थिती देखील निर्माण झाली होती. मात्र, अखेर शस्त्रसंधी लागू करण्यात आली, पण अद्यापही 23 निष्पाप जीवांच्या मृत्यूच्या जखमा कायम आहेत. त्यातच, क्रीडा मंत्रालयाने हॉकीच्या एशिया कॅपसाठी पाकिस्तानला भारतात येण्यास हिरवा कंदील दर्शवल्यावरुन आदित्य ठाकरेंनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
कालपासून एक धक्कादायक बातमी ऐकली आहे, स्पोर्ट्स मंत्रालयानं एशिया कपसंदर्भात पाकिस्तानला हिरवा कंदील दिला आहे. एप्रिलमध्ये पहलगामचा हल्ला झाला, पण अद्यापही अतिरेकी पकडलेले नाहीत. दुसरीकडे संशयित म्हणून काढण्यात आलेलं स्केच चुकीचं होतं, असे एनआयएनं सांगितलं आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर जगभरात आपण गेलो. भाजपला वाटत असेल आपण यावर मतं घेऊ शकतो, तर हे चालणार नाही, अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी भाजप नेत्यांना आणि केंद्रातील मोदी सरकारला फटकारलं आहे.
पाकिस्तान हॉकी संघाला परवानगी
दरम्यान, यंदा 27 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर या कालावधीत भारतात होणाऱ्या पुरुष हॉकी आशिया कपमध्ये भाग घेण्यापासून पाकिस्तानचा हॉकी संघ रोखला जाणार नसल्याची माहिती आहे. कारण, क्रीडा मंत्रालयाने पाकिस्तानच्या सहभागस परवानगी दिल्याची माहिती आहेत. त्यामुळे, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमी झाला का?, पहलगाम हल्ला भारत इतक्या लवकर विसरला का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. आदित्य ठाकरेंनीही यावरुनच सरकारला लक्ष्य केलं आहे.
जय शाह हेच आयसीसीचे अध्यक्ष - ठाकरे
सरकारने पहिले हॉकीसाठी आणि नंतर क्रिकेटसाठी पाकिस्तानबरोबर तुम्ही खेळणार आहात का? हे आधी स्पष्ट करावे. देशाचे परराष्ट्र मंत्री काय करत आहेत. बीसीसीआय बोललं की आम्ही खेळणार नाही तर आयसीसीला ऐकावं लागेल, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. तसेच, आयसीसी अध्यक्ष कोण आहे? जय शाह असे म्हणत आदित्य ठाकरेंनी भारत-पाकिस्तान क्रिकेटचा मुद्दा जय शाहांच्या कोर्टात नेला आहे. तसेच, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे चिरंजीवच आयसीसीचे अध्यक्ष आहेत, मग आशिया कप स्पर्धेत पाकिस्तानला एंट्री का? असा सवाल आदित्य यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा
'नगरसेवक' शब्द देशभरात वापरावा; शिवसेनेची दिल्लीत मागणी; सांगितला बाळासाहेबांचा इतिहास