नवी दिल्ली भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO)  भारताच्या सूर्य मोहिमेबाबत (Solar Mission) मोठी माहिती दिली आहे. इस्रोने ट्वीट करत ही चांगली बातमी देशवासियांना दिली आहे. भारताच्या आदित्य एल-1 (Aditya L-1) मोहिमेतंर्गत पाठवण्यात आलेल्या अंतराळ यानाने पृथ्वीपासून 9.2 लाख किलोमीटरचे अंतर पार केले आहे.  


इस्रोने आदित्य एल-1 मोहिमेबाबत माहिती देताना सांगितले की, आदित्य एल-1 ने आतापर्यंत 9.2 लाख किमीचे अंतर गाठले असून आता सन पॉईंट एल-1 चा मार्ग शोधत आहे. पृथ्वीच्या प्रभावक्षेत्राच्या बाहेर अंतराळयान पाठवण्यात इस्रोला सलग दुसऱ्यांदा यश आले आहे. याआधी  मार्स ऑर्बिटर मिशन (मंगलयान) मध्ये पृथ्वीच्या प्रभाव क्षेत्राबाहेर पहिल्यांदा यान पाठवण्यात इस्रोला यश आले होते. 






लॅरेंज पॉईंटच्या दिशेने मार्गक्रमण 


19 सप्टेंबर रोजी इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, आदित्य एल-1 हा सूर्य आणि लॅरेंज पॉईंट 1 च्या दिशेने पुढे सरकला आहे. आदित्यला आता अंतराळात 110 दिवस प्रवास करायचा आहे.  त्यानंतरच आदित्य हा एल-1 पॉईंटवर पोहचणार आहे.  


फेब्रुवारीमध्ये सूर्याचे पहिले चित्र...


आदित्य-L1 वरून सूर्याचे पहिले चित्र फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये मिळणार आहे. VELC ची निर्मिती भारतीय खगोल भौतिकी संस्थेने केली आहे. इस्रोच्या सन मिशनमध्ये स्थापित VELC सूर्याचे एचडी फोटो घेईल. L1 पर्यंतचा प्रवास पूर्ण केल्यानंतर आदित्यचे सर्व पेलोड्स चालू होतील. म्हणजे त्यात बसवलेली सर्व उपकरणे सक्रिय होतील. त्यानंतर आदित्य सूर्याचा अभ्यास सुरू करेल. या दरम्यान, आदित्यवरील सर्व उपकरणे सुरळीतपणे सुरू आहेत की नाही, याची चाचणीदेखील इस्रोकडून करण्यात येणार आहे. 


आदित्य L-1 मध्ये विशेष यंत्रणा तयार करण्यात आली आहे, जेणेकरुन कोणत्याही परिस्थितीत यान सूर्याच्या कक्षात टिकू शकेल. आदित्य L-1 ची रचना खास प्रकारे करण्यात आली आहे, ते सूर्याच्या फार जवळ जाणार नाही, पण लॅरेंज पॉईंटवर  राहील आणि सूर्यावर संशोधन करेल. आदित्य L-1 ही एक प्रकारे स्पेस टेलिस्कोप आहे, जी स्पेसमध्ये खास पद्धतीने काम करेल.