श्रीहरिकोटा : भारताच्या सूर्यायानाने आदित्य एल1 (Aditya L1) ने सूर्य मोहिमेच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. पृथ्वीभोवतीची प्रदक्षिणा पूर्ण करुन या यानाने नव्या ऑर्बिटमध्ये प्रवेश केला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच, इस्रोने (ISRO) याबाबत माहिती दिली आहे. इस्रोने ट्वीट करत म्हटलं आहे की, आदित्य एल1 या यानाचं दुसरं अर्थ बाऊंड मॅन्यू पूर्ण केलं आहे. याचाच अर्थ या यानाने सूर्याभोवतीची दुसरी प्रदक्षिणा देखील पूर्ण केली आहे.
पृथ्वीच्या नव्या कक्षेत प्रवेश
इस्रोच्या टेलीमेट्री, ट्रॅकिंग आणि कमांड नेटवर्कने (ISTRAC) हे ऑपरेशन केले आहे. याबद्दल माहिती देताना इस्रोने म्हटलं आहे की, मॉरिशस, बंगळुरू आणि पोर्ट ब्लेअर येथे असलेल्या ITRAC च्या ग्राउंड स्टेशनने या उपग्रहाचा मागोवा घेतला आहे. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, आदित्य-एल1 ने मंगळवार 5 सप्टेंबर रोजी पहाटे 2 वाजून 45 मिनिटांनी पृथ्वीच्या नव्या कक्षेत प्रवेश केला. पृथ्वीची ही कक्षा 282 किमी X 40,225 किमी इतकी आहे. पृथ्वीपासून या कक्षाचे किमान अंतर 282 किमी आहे. तर कमाल अंतर 40,225 किमी असल्याचं इस्रोकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, आदित्य एल1 10 सप्टेंबर रोज भारतीय वेळेनुसार, सकाळी 2.30 वाजता पृथ्वीच्या नव्या कक्षेत प्रवेश करणार असल्याचं इस्रोकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आताच्या कक्षेतील आदित्य यानाची प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर हे यान पृथ्वीच्या नव्या कक्षेत प्रवेश करण्यास सक्षम असेल. दरम्यान, या यानाची पृथ्वीभोवतीची ही प्रदक्षिणा पूर्ण झाली की त्याच्या मोहिमेच्या दिशेने त्याचं आणखी एक सकारात्मक पाऊल पडेल.
पूर्ण केली पृथ्वीभोवतीची पहिली प्रदक्षिणा
आदित्य यानाने पृथ्वीभोवतीची पहिली प्रदक्षिणा पूर्ण केली आहे. आदित्य एल1 ला त्याच्या नियोजित स्थानी पोहचण्यासाठी जवळपास चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. लॅग्रेंज पॉईंट 1 वरुन आदित्य यान हे सूर्याचा अभ्यास करणार आहे. त्यासाठी या यानाला 15 लाख किलोमीटरचा प्रवास करावा लागणार आहे. भारताने 2 सप्टेंबर रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून आपलं पहिलं आदित्य यान हे यशस्वी प्रक्षेपित केलं. यामुळे आता इस्रोला सूर्याचा अभ्यास करणं शक्य होणार आहे.